गोवा खबर : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळ देत, चंडीगढ येथील ‘पंजाब राजभवन’ येथे 30 मे 2026 रोजी गोवा राज्य स्थापना दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगढ प्रशासनाचे प्रशासक गुलाबचंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्यात सिक्कीम आणि तेलंगणा या राज्यांचे स्थापना दिनही संयुक्तपणे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात चंडीगढ प्रशासनाचे वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी स्वप्नील नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी गोव्याचा समृद्ध इतिहास, स्वातंत्र्य लढा आणि तेथील विविधतेने नटलेल्या संस्कृतीवर प्रकाश टाकला.
माध्यमांशी बोलताना स्वप्नील नाईक म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात पंजाब आणि गोव्याचे अनोखे नाते आहे. गोव्याला साडेचारशे वर्षांचा पोर्तुगीज राजवटीचा इतिहास आहे. 1961 मध्ये गोव्याला मुक्ती मिळाली, आणि या मुक्ती संग्रामात पंजाबमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि लष्करी जवानांनी मोलाचे योगदान दिले होते. काहींनी तर या लढ्यात आपले सर्वोच्च बलिदानही दिले. त्यामुळे पंजाब आणि गोव्याचे नाते ऐतिहासिक दृष्ट्या खूप घट्ट आहे.”
गोव्याच्या संस्कृतीबद्दल अनेकांचा असा समज असतो की गोवा म्हणजे केवळ ख्रिश्चन (कॅथलिक) संस्कृतीचे प्राधान्य असलेले राज्य आहे, परंतु स्वप्नील नाईक यांनी आपल्या भाषणात हा गैरसमज दूर केला. ते म्हणाले की, गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन संस्कृतीचा एक सुंदर मेळ पाहायला मिळतो. तिथे जितके सुंदर चर्च आहेत, तितकीच ऐतिहासिक आणि पारंपरिक मंदिरेही आहेत. गोव्यातील लोक अत्यंत गुण्यागोविंदाने आणि शांततेत एकत्र राहतात, हीच गोव्याची खरी ओळख आणि वैशिष्ट्य आहे.
या प्रसंगी चंडीगढ साहित्य कला अकादमीच्या कलाकारांनी विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्ये सादर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संदेशानुसार, देशातील प्रत्येक राजभवनामध्ये इतर राज्यांचे स्थापना दिन साजरे करून विविध प्रांतातील नागरिकांना एकत्र आणण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचेही नाईक यांनी आवर्जून नमूद केले. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या कार्यक्रमाला चंडीगढमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला