गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियोळ मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव झाला, तरी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) या मतदारसंघावरील आपला दावा सोडणार नाही, अशी भूमिका मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मांडली आहे.
याविषयी भाजपसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल आणि निवडणूक भाजप-मगो युतीनेच लढवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मगो कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आणि इतर पक्षांकडे त्यांचा कल जाऊ नये यासाठी फोंडा आणि शिरोडा मतदारसंघांमध्ये पक्ष लवकरच आपली कार्यालये उघडणार आहे. प्रादेशिक पक्ष चालवणे आणि टिकवणे हे आर्थिक व राजकीयदृष्ट्या सध्या खूप कठीण झाले असले, तरी मगो पक्ष गेल्या ६०-६५ वर्षांपासून गोव्यात आपले अस्तित्व टिकवून आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.