गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गोव्यातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी समाजाला गोव्याच्या विधानसभेत राजकीय आरक्षण देण्याबाबत तसेच गोव्यात बांगलादेशी घुसखोरांनी निर्माण केलेल्या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.
अलीकडेच हुबळी येथील बसस्थानकावर ताब्यात घेण्यात आलेल्या काही संशयीत बांगलादेशी नागरिकांची छाननी सुरू असून, त्याबाबतची माहिती शाह यांना देण्यात आली. दरम्यान, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून केंद्र सरकारने यासंबंधीचे विधेयक आधीच संमत केले आहे. आता केवळ प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही दिल्लीत ‘सेवा तीर्थ’ येथे सदिच्छा भेट घेतली.