Connect with us

गोवा खबर

इफ्फीतील गाला प्रीमियरमध्ये अलौकिक घटक आणि मानवी भावनांचा सुरेख मिलाफ साधणारा महत्त्वाकांक्षी मल्याळम चित्रपट ‘हाफ’ प्रदर्शित

Published

on

Spread the love

गोवा खबर:57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज अलौकिक घटकांचा मानवी भावनांशी मेळ घालणाऱ्या ‘हाफ’ या मल्याळी चित्रपटाचा भव्य प्रीमियर सादर झाला. या प्रदर्शनातून प्रेक्षकांना एका अपारंपरिक चित्रपटीय विश्वाची झलक पाहायला मिळाली.

पत्र सूचना कार्यालयाद्वारे या चित्रपटावर आधारित आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री अमला पॉल म्हणाल्या की, कलाकारांना व्हॅम्पायर किंवा अलौकिक शक्तींशी संबंधित व्यक्तिरेखा साकारण्याच्या संधी क्वचितच मिळतात. त्यामुळे ‘हाफ’ हा चित्रपट माझ्यासाठी विशेष रंजक प्रकल्प ठरला. ज्या प्रकारचे पात्र रंगवण्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती मात्र एक अभिनेत्री म्हणून अशा प्रकारची भूमिका वठवायची त्यांना नेहमीच इच्छा होती ती भूमिका करण्याची संधी या चित्रपटामुळे मिळाली असे त्यांनी सांगितले.

अभिनेता अब्बास यांनी या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन, त्यांनी यापूर्वी केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका असे केले. जैसलमेरच्या तीव्र उष्णतेमध्ये चित्रीकरण करताना समोर आलेल्या आव्हानांची आठवण सांगताना ते म्हणाले की, या अनुभवाने त्यांना परिचित क्षेत्राच्या पलीकडे नेऊन ठेवले. एक सुखद धक्का असे या चित्रपटाचे वर्णन करत प्रेक्षकांना एक मनोरंजक चित्रपटीय अनुभव देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी या चित्रपटाशी संबंधित संपूर्ण पथकाची प्रशंसा केली.

अभिनेता रणजित सजीव याच्यासाठी, त्याला अभिनयाची आवड असल्यामुळे हा चित्रपट विशेष उत्साहवर्धक ठरला. ‘हाफ’ (Half) हा वेगळ्या दृष्टिकोनातून साकारलेला ऍक्शन थरारपट असल्याचे त्याने सांगितले. चित्रपटातील कठीण हाणामारीच्या दृश्यांसाठी त्याने आणि ऐश्वर्या राज या दोन्ही प्रमुख कलाकारांनी विशेष कार्यशाळेत भाग घेतला होता. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्याने सांगितले की, ॲक्शनप्रधान चित्रपट असूनही ‘हाफ’मध्ये एकही स्लो-मोशन दृश्य नाही. प्रेक्षकांना चित्रपटगृहात एक वेगळा अनुभव देण्याचा चित्रपटाच्या संपूर्ण चमूचा प्रयत्न असल्याचे यातून दिसून येते.

अभिनेत्री ऐश्वर्या राज हिने, भावंडांमधील नाते हा चित्रपटातील सर्वाधिक भावलेला पैलू असल्याचे सांगितले. हाणामारीची  दृश्ये शिकणे आणि सादर करणे हे आव्हानात्मक होते. तसेच, हा अनुभव आपण अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूप वेगळा होता, असेही तिने नमूद केले. ‘हाफ’ या चित्रपटात व्हॅम्पायर्सचे (रक्तपिपासू पिशाच्च) वेगळ्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. त्यांना पारंपरिक अलौकिक प्राण्यांऐवजी मैत्रीपूर्ण, आपलेसे वाटणारे आणि अगदी आपल्या शेजारी राहणाऱ्या सामान्य व्यक्तींप्रमाणे दाखवण्यात आले आहे, असे तिने सांगितले.

निर्मात्या ॲन संजीव यांनी चित्रपटाची धाडसी संकल्पना आणि वेगळा विषय याविषयी माहिती दिली. मल्याळम चित्रपटसृष्टीला भौगोलिक सीमांच्या पलीकडे नेण्याची त्यांच्या चमूची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ही आगळीवेगळी कथा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी संपूर्ण चमू उत्सुक होता, असेही त्या म्हणाल्या. भविष्यात प्रेक्षकांसाठी आणखी अनोखा आणि रंजक आशय असलेले चित्रपट आणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Continue Reading