गोवा खबर : राज्यात सध्या कडक उन्हाळा असल्याने घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी एसी, गिझर, फ्रीज, वॉटर पंप यांसारख्या मोठ्या विद्युत उपकरणांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या वीजवापरामुळे अनेकांची वीजबिले मोठ्या प्रमाणात वाढून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील वीज ग्राहकांकडून वीजबिलांबाबत अनेक तक्रारी वीज खात्याकडे येत आहेत. या वाढलेल्या बिलांमागील मुख्य कारण म्हणजे ग्राहकांनी आपल्या वाढलेल्या वीजवापरानुसार मंजूर वीजभार (सँक्शन्ड लोड) वाढवून न घेणे हे आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत दिले.
मंत्री ढवळीकर यांनी ग्राहकांना जाहीर आवाहन केले आहे की, जर घरगुती किंवा व्यावसायिक वीजबिले वाढून येत असतील, तर ग्राहकांनी त्वरित आपल्या गरजेनुसार मंजूर वीजभार वाढवून घ्यावा. अनेक ग्राहक अजूनही जुन्या आणि कमी मंजूर क्षमतेवरच जास्त वीज वापरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त भार पडल्याने नियमानुसार जास्त दराने शुल्क (पेनल्टी/अतिरिक्त भार शुल्क) आकारले जात असून, पर्यायाने वीजबिले फुगत आहेत. ग्राहकांनी वीज विभागाकडे वीजभार वाढीसाठी रीतसर अर्ज केल्यास हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. या संदर्भातील अर्ज वीज खात्याकडे उपलब्ध असून, अर्ज भरताना मीटरची चाचणी केलेला अहवाल देखील सोबत जोडणे अनिवार्य राहील, असे त्यांनी सांगितले.
पीएम-कुसुम योजनेअंतर्गत ७०० सौर पंपांना मंजुरी याच पत्रकार परिषदेत मंत्री ढवळीकर यांनी गोव्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली. राज्यासाठी ‘पीएम-कुसुम’ योजनेअंतर्गत ७०० सौर पंपांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून सध्या या योजनेची पुनर्रचना सुरू असून, पुढील १५ दिवसांत सुधारित योजना पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ही सुधारित योजना प्राप्त होताच राज्यात ७०० सौर पंपांच्या स्थापनेची प्रत्यक्ष प्रक्रिया गतिमान केली जाईल. या योजनेचा थेट फायदा गोव्यातील शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना सौरऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा उपलब्ध होईल. यामुळे केवळ पिकांना नियमित पाणीच मिळणार नाही, तर शेतकऱ्यांच्या वीजखर्चात मोठी बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.