गोवा खबर:“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला विकासाच्या मार्गावर नेले आहे. गोव्याचा विकास पाहता, आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती मोठ्या फरकाने विजयी होऊन पुन्हा सत्ता स्थापन करेल,” असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीतील युतीचे उमेदवार रितेश रवी नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
विकसित गोव्याचे स्वप्न वेळेआधीच पूर्ण होईल
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सावंत यांनी २०३७ पर्यंत ‘विकसित गोवा’ करण्याचे ध्येय ठेवले आहे, परंतु सध्याचा वेग पाहता हे स्वप्न दहा वर्षे आधीच म्हणजे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी विकासाचा जो पाया रचला, त्यावर आज भव्य सोयी-सुविधा उभ्या राहत आहेत. यामुळेच गोव्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असून आगामी काळात ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
रवी नाईक यांना ‘मतदानरुपी’ श्रद्धांजली द्या
रितेश नाईक यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, रवी नाईक यांचे योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, परंतु काँग्रेसने ते सौजन्य दाखवले नाही. मतदारांनी ९ तारखेला रितेश नाईक यांना मतदान करून रवी नाईक यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
फोंडा ठरणार ‘शैक्षणिक हब’: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंडा मतदारसंघासाठी अनेक घोषणा केल्या. ते म्हणाले:
* फर्मागुडी येथे फॉरेन्सिक आणि व्हेटर्नरी महाविद्यालयानंतर आता आयआयटी कॅम्पस देखील येणार आहे.
* आयडी इस्पितळाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाईल.
* नव्या ५००० सरकारी नोकऱ्यांची भरती केली जाणार आहे.
* फोंडा शहराला ‘टेम्पल सिटी’ सोबतच ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित केले जात आहे.
व्यासपीठावरील उपस्थिती
या सभेला मंत्री सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, दिगंबर कामत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मगोचे दीपक ढवळीकर, आमदार मायकल लोबो, गोविंद गावडे यांसह अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.