गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्सना संबोधित केले. विकासाचे इंजिन या रूपाने एमएसएमई’; निर्मिती, निर्यात आणि अणुउर्जा मोहिमा; नियामकीय, गुंतवणूक तसेच व्यवसाय सुलभता सुधारणा या विषयावर हे वेबिनार्स आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, निर्मिती आणि निर्यात या विषयांवर आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्स अत्यंत महत्त्वाची आहेत. हा अर्थसंकल्प विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच सर्वंकष अर्थसंकल्प आहे याचा उल्लेख करून अपेक्षेच्याही पलीकडे साकार हा या अर्थसंकल्पाचा सगळ्यात उल्लेखनीय पैलू आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अनेक क्षेत्रांमध्ये तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजांच्या पलीकडे जाऊन सरकारने पावले उचलली आहेत याकडे मोदी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. निर्मिती आणि निर्यात यांच्या बाबतीत या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय देखील त्यांनी अधोरेखित केले.
सध्या संपूर्ण जग राजकीय अनिश्चिततेचा सामना करत असून, संपूर्ण विश्व भारताकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहत आहे असे पंतप्रधान म्हणाले. कोविड संकटाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना भारताने जागतिक विकासाला गती दिली. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे नेत आणि वेगवान सुधारणा करत भारताने हे यश साध्य केले, असे त्यांनी नमूद केले. या प्रयत्नांमुळे कोविडचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव कमी झाला आणि भारत सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला, असे ते म्हणाले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन आहे आणि कठीण परिस्थितीतही भारताने आपली प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सिद्ध केली आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारने सुलभरित्या कर्ज मिळवणे शक्य करण्यासह नवीन प्रकारची कर्जसुविधादेखील सुरू केल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, आता लोकांना विना हमी कर्ज मिळत आहे. याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.
गुंतवणुकीला चालना देण्यात राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे हा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले, राज्यांकडून व्यवसाय सुलभतेला जितकं जास्त प्रोत्साहन मिळेल तेवढी जास्त गुंतवणूक त्या राज्यांमध्ये होईल.यामुळे त्या राज्यांचाच सर्वाधिक फायदा होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त लाभ कोण मिळवते हे पाहण्यासाठी राज्यांमधल्या स्पर्धेला त्यांनी प्रोत्साहन दिले.प्रगतीशील धोरणं आखणारी राज्यं कंपन्यांना आपल्या राज्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित करू शकतात असे त्यांनी नमूद केले.
वेबिनारमध्ये सहभागी झालेले सगळेजण या सर्व मुद्द्यांवर गांभीर्यानं विचार करत आहेत असा विश्वास व्यक्त करुन कृतीयोग्य पर्याय निर्धारित करणे हा या वेबिनारचा हेतू आहे असं पंतप्रधान म्हणाले. धोरणं, योजना आणि मार्गदर्शक सूचना तयार करण्यामध्ये वेबिनारमध्ये सहभागी व्यक्तींचं सहकार्य महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. अर्थसंकल्पानंतर धोरणांच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात यामुळे मदत होईल असं त्यांनी नमूद केलं. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीचं योगदान खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अनेक केंद्रिय मंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहिले होते.