Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या पहिल्या हुतात्म्याला राज्याच्यावतीने आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोर्तुगीजांच्या हुकूमशाही राजवटीपासून गोव्याला मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी गोवा मुक्ती चळवळीत उडी घेतली आणि त्यापैकी एक शूर तरुण  स्वर्गीय बाळा राया मापारी होते ज्यांनी २६ व्या वर्षी मृत्यूला कवटाळले आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले हुतात्मा झाले असे सांगितले.

माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले शहीद हुतात्मा बाळा राया मापारी यांचा ७० व्या पुण्यतिथी (बलिदान दिवस) निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

गोवा भंडारी समाज आणि बाळा राया मापारी स्मारक देखरेख समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाळा राया मापारी हे गोवा मुक्तीच्या हेतूने प्रेरित होते आणि निःस्वार्थपणे गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरले होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि पराक्रमामुळे गोवा मुक्तीच्या चळवळीला चालना मिळाली असे त्यांनी सांगितले.

डॉ. सावंत यांनी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी खूप काही केले आहे. गोव्याबाहेरील स्वातंत्र्यसैनिकांचेही स्मरण केले जाते आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे असे सांगितले. हरियाणातील असेच एक स्वातंत्र्यसैनिक कर्नल बेनिपाल सिंग ज्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आहेत व त्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी जपण्याचा आणि शूर हुतात्मा बाळा राय मापारी यांना आदरांजली वाहण्यासाठी सरकार एका वर्षाच्या आत एक घर बांधणार असून तिथे त्यांच्या स्मृतीशी संबंधित कलाकृती जतन केल्या जातील. या उपक्रमामुळे त्यांच्या आठवणी पिढ्यान्पिढ्या टिकून राहतील असे ते म्हणाले.

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी यावेळी बोलताना आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे ऋणी आहोत. आज आपण त्यांच्या बलिदानाच्या आणि हौतात्म्याच्या मोबदल्यात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, असे सांगितले. सरकारने अलीकडेच या स्वातंत्र्यसैनिकांप्रती असलेल्या आपल्या ऋणाचे प्रतीक म्हणून १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे असे ते म्हणाले.

मत्स्योध्योग मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीदरम्यान अस्नोडा हे केंद्रबिंदू होते असे सांगितले. हुतात्मा बाळा मापारी यांनी अद्भुत आणि अनुकरणीय धैर्य आणि शौर्य दाखविले असे ते म्हणाले. समाज आणि गोव्याच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी त्यांनी तरुणांना मापारींच्या त्यागापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

हुतात्मा मापारी यांच्या कन्या, लक्ष्मी चंद्रकांत चोडणकर, नेहरू युवा केंद्राचे संचालक कालिदास घाटवळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोवा प्रमुख, मधू नाईक, उपाध्यक्ष,नोनू नाईक, हुतामा मापारी यांचे पुतणे ज्ञानेश्वर आर मापारी, बहूजन आवाज दैनिकाचे सुरेश नाईक, माजी अध्यक्ष मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे माजी अध्यक्ष संजय हरमलकर, माहिती संचालक दीपक बांदेकर, माहिती अधिकारी ऑल्विन परेरा, किरण मुननकर, सहाय्यक माहिती अधिकारी,  निखिल प्राजक्ते, माहिती सहाय्यक गोविंद  गांवकर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सुरवातीस जिल्हा पंचाचत सदस्या दीक्षा कांदोळकर यांनी स्वागत केले तर अस्नोडाचे सरपंच मेघश्याम चोडणकर यांनी आभार मानले.