गोवा खबर : केंद्र सरकारकडून पूर्णपणे निधी मिळवून देण्यात येत असलेला नक्ष हा पायलट प्रकल्प दीर्घकाळात शहरी नियोजनात मदत करण्यास आणि शहरी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत करण्याबरोबरच सुरळीत आणि निष्पक्ष जमीन व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नक्ष (नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स) च्या शुभारंभप्रसंगी सांगितले. पणजी येथे मालमत्ता भू-नोंदणी संचालनालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गोव्याचे लोक भाग्यवान आहेत असे सांगून डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोवा एक लहान राज्य असूनही पणजी, मडगाव आणि कुंकळी ही तीन ठिकाणे या प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत असे सांगितले. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जीआयएस आधारित ३-डी मॅपिंग तंत्रज्ञानाव्दारे करण्यात येईल. मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित संबंधित मालमत्ता कर रेकॉर्ड अद्यावत करणे आणि सर्व नकाशे एकत्रित करणे – टप्प्याटप्प्याने राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात येणाऱ्या भीतीचे निवारण करताना मुख्यमंत्री म्हणाले की लोकांनी घाबरू नये आणि संबंधित नगरपालिकांनी प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करावी. या प्रकल्पांमुळे जमिनीच्या मालकी हक्कांसारखे कोणतेही रेकॉर्ड बदलणार नाहीत. “हे जीआयएस आधारित ३-डी नकाशे कर आकारणी, अतिक्रमण हटविणे आणि शहर नियोजन उपक्रमांसाठी उपलब्ध असतील असे ते म्हणाले, “नक्ष हे विकसित भारत २०४७ च्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे असे ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी नक्षाच्या लोगोचे आणि माहिती पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले. आयुक्त तथा महसूल सचिव श्री संदीप जॅकीस, आयएएस यांनी हा एक देशव्यापी प्रकल्प असून सरकार आणि सामान्य माणसाला या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचे सांगितले. यामुळे जमीन महसूल संकलन सुधारण्यास, जमिनीचे वाद दूर करण्यास मदत होईल आणि सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी या शहरी संस्थांनी सहकार्य करण्याचे ते म्हणाले.
सुरवातीस मालमत्ता आणि भू-नोंदणी संचालक श्री रोहित कदम यांनी स्वागतपर भाषणात नक्ष कार्यक्रमाचा फायदा जमिनीची नोंदणी पारदर्शक आणि कार्यक्षमतेने करण्यास मदत करील असे सांगितले.
यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते, आयएएस, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लीटस, आयएएस व महानगरपालिका व पंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरवातीस आयईएस अमरेंद्र कुमार सिंह यांनी नक्ष प्रकल्पाची माहिती दिली.