गोवा खबर : महाकुंभमेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक भाविक स्नानासाठी एकत्र येणार आहेत; मात्र आज आपल्याला बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय-अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. बांगलादेशात आज आपली मंदिरे आणि मूर्ती तोडल्या जात आहेत. ही समस्या सोडवायची असेल, तर बांगलादेश, भारत आणि विदेशातील सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. तेव्हाच यावर उपाय काढता येईल. यासाठी हिंदु जनजागृती समितीने लावलेले काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन भाविकांनी नक्की पाहावे, असे आवाहन इस्कॉनचे वृंदावन धाम येथील चंद्रोदय मंदिराचे स्वामी कंजलोचन कृष्णदास यांनी केले.
ते महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सेक्टर ६, कैलाशपुरी, भारद्वाज मार्ग येथे काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर कट्टरवादी आणि आतंकवाद्यांनी केलेल्या भीषण अत्याचारांविषयीच्या चित्रप्रदर्शन व ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी स्वामी कंजलोचन कृष्णदास, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी इस्कॉनचे स्वामी राधामोहन दास आणि समितीचे उत्तर प्रदेश व बिहार राज्य समन्वयक विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.