Connect with us

गोवा खबर

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने एमएसएमई उद्योगांसाठी वित्तपुरवठा विषयक उपक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (गोवा-आयडीसी)च्या वतीने पाटो-पणजी येथील नोवोटेल गोवा मध्ये “बँकिंग ऑन ग्रोथ: एम्पॉवरिंग एमएसएमईज थ्रू कोलॅबोरेशन” या महत्वाच्या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. या कार्यक्रमात ३१ आघाडीच्या बँकांचा सहभाग होता. गोव्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढीला चालना देण्यासाठी वित्तीय क्षेत्राची वचनबद्धता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित झाली.

गोव्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बँकिंग समुदाय आणि एमएसएमई यांच्यातील सहकार्य वाढवणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. तसेच, राज्यातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक भूखंड वितरण, हस्तांतरण आणि उप-भाडेपट्टा प्रक्रिया सुलभ करण्याबाबत गोवा औद्योगिक विकास महामंडळ (वाटप, हस्तांतरण आणि उप-भाडेपट्टा) नियमन-२०२३ या धोरणाबाबत उद्योग क्षेत्रातील भागधारकांमध्ये जाणीव निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे:

1. जागरूकता: गोवा-आयडीसीचे नवीन धोरण आणि याबाबत राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये वित्तसंस्थांची भूमिका याबाबत बँकिंग समुदायास अवगत करणे.

2. सहकार्य वाढीला चालना: वित्त पुरवठ्यातील दुवा जोडणे आणि या क्षेत्रातील आव्हानांवर उपाययोजना शोधण यासाठी बँकिंग क्षेत्र आणि एमएसएमई उद्योग क्षेत्र यांच्यामध्ये सकारात्मक व नियमित संवाद वाढवणे

3. एमएसएमई उद्योगांचे सक्षमीकरण: एमएसएमई उद्योगांची भरभराट करणे आणि गोव्याच्या आर्थिक विकासात एमएसएमई उद्योगांचे योगदान वाढवणे यासाठी या उद्योग क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यात बँकिंग क्षेत्राची महत्वाची भूमिका व व्यावसायिक संधी अधोरेखित करणे

कार्यक्रमातील ठळक नोंदी:

• राज्याच्या औद्योगिक विकासासाठी वचनबद्ध असलेल्या विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३१ बँकांचा कार्यक्रमात सहभाग.

चार्टर्ड अकौंटंट व आर्थिक क्षेत्रातील तज्ञ संतोष केंकरे यांनी गोव्यातील सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राताल वित्त पुरवठा करण्याबाबत कृतिशील धोरण या विषयावर कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शन सत्रामध्ये भर दिला.

नवीन नियमांबाबत सादरीकरण: गोवा आयडीसीच्या कन्सल्टंट सुनिधी साहनी यांनी गोवा-आयडीसीच्या नवीन धोरण व सलुभ नियमन प्रक्रियेमुळे उद्योगांना होणारे लाभ सादर केले.

 गोवा राज्य उद्योग संघटना (जीएसआयए) चे अध्यक्ष अनिरुद्ध धेम्पे आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (जीसीसीआय) मानद सचिव यतीन काकोडकर यांनी गोव्याच्या आर्थिक विकासामधील उद्योगांची भूमिका व दृष्टिकोन यावर विचार मांडले.

उद्योग क्षेत्रातील आव्हाने आणि संधी याबाबत बँकिंग क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रविमल अभिषेक (आयएएस) यांनी बँकिंग क्षेत्र आणि एमएसएमई यांच्यातील सहयोगाचे, भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले:

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि एमएसएमईंना त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा-आयडीसी कटिबद्ध आहे. सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बँकिंग समुदाय आणि औद्योगिक भागधारकांसोबत सतत सहकार्य करत राहण्याची भूमिका महामंडळाने घेतली आहे.