गोवा खबर:६३ व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण, कायदा आणि न्यायमंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा यांनी आज माथानी साल्ढान्हा प्रशासकीय संकुलात आयोजित जिल्हा पातळीवरील गोवा मपक्ती दिन सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकविला.
यावेळी बोलताना श्री सिक्वेरा यांनी गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून विद्यार्थी आणि युवक ही देशाची संपत्ती असल्याचे प्रतिपादन केले. गोव्याचे आणि राष्ट्राचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले. राज्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच गोमंतकीयांच्या उत्थानासाठी सरकार कार्यरत असून आपले सुंदर राज्य टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
१९४७ मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले पण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला स्वतंत्र होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागली. या स्वातंत्र्याच्या क्षणासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले असे ते म्हणाले.
सरकारने बहुतेक स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत. सरकारने नुकतेच सन्मानपत्र व आर्थिक मदत देऊन प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या बलिदानाची दखल घेतली आहे. गोवा मुक्ती करण्यासाठी या कुटुंबांना किती त्रास सहन करावा लागला हे सरकारला समजते. हा विजय जपण्याची जबाबदारी आता आपली आहे असे ते म्हणाले.
गेल्या १० वर्षांपासून गोव्याने पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि सामाजिक उन्नती या क्षेत्रात प्रचंड विकास केला आहे असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाच्या आणि राज्याच्या विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. तसेच राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी अथक प्रयत्न करीत आहेत असे श्री. सिक्वेरा म्हणाले.
मडगांव भागातील शाळांच्या विध्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी आमदार श्री उल्हास तुयेंकर, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.