गोवा खबर : जागतिक पातळीवर संदेशवहनाला चालना देण्याप्रती आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचे दर्शन मुंबईतील एका कार्यक्रमात घडून आले. केंद्रीय संदेशवहन मंत्रालयान्तर्गत टपाल विभागाच्या सचिव वंदिता कौल यांनी अंटार्क्टिकामधील पेंग्विन चितारलेल्या विशेष पोस्टकार्डांचा संच प्रकाशित केला.
ही पोस्टकार्डे 44 व्या अंटार्क्टिका मोहिमेदरम्यान भारती ब्रांच टपाल कार्यालय आणि मैत्री टपाल कार्यालय येथून मुंबईला आणली जातील. NCPOR अर्थात राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागरी संशोधन केंद्राच्या संचालकांनी अंटार्क्टिका मैत्री टपाल कार्यालय आणि भारती टपाल कार्यालय येथून दूरदृश्य माध्यमातून कार्यक्रमात भाग घेतला.
भारताच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यात टपाल विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. महापेक्स 2025 सारख्या उपक्रमांमधून आपल्या संपन्न इतिहास कला आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होते, असे मत कौल यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक निदर्शक (GI) मानांकन मिळाल्याप्रीत्यर्थ, कौल यांनी यावेळी महाबळेश्वर टपाल कार्यालयातील स्ट्रॉबेरीच्या चित्राचा कायमस्वरूपी शिक्का प्रकाशित केला. मुंबईतील जीपीओ म्हणजे सामान्य टपाल कार्यालयाला त्यांनी एका कार्यक्रमानिमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी जीपीओ च्या वारसा वास्तूच्या संवर्धन आणि नूतनीकरणासाठी होत असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच, महापेक्स2025 या टपाल तिकिटांच्या उत्सवासाठीच्या शुभंकराचे अनावरण आणि ‘संकलन करा, जोडून घ्या, साजरा करा- टपाल तिकिटांचा महोत्सव’ या घोषवाक्यवजा शिक्क्याचे प्रकाशनही त्यांनी केले. हा महोत्सव 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार आहे. हा शिक्का महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील शीर्ष टपाल कार्यालयांतून वितरणासाठी बाहेर पडणाऱ्या वस्तूंवर मारला जाणार आहे.