गोवा खबर : रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराने सीएसआर भागीदार जॉलीबोर्ड लिमिटेड, मुंबई यांच्या सहकार्यातून २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मडगावस्थित दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयास ४३ लाख रुपये किमतीचे ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (OCT) यंत्र दान केले.
२०२३ मध्येही जॉलीबोर्ड लिमिटेडने रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराच्या माध्यमातून याच डायबेटिक रेटिनोपॅथी सेंटरला २५ लाख रुपये किमतीची ३ क्रिटिकल डायग्नॉस्टिक आणि लेसर उपचार यंत्रे दान केली होती. गेल्या वर्षभरात गोव्यातील १०००हून अधिक रुग्णांवर या केंद्रामध्ये रेटिनोपॅथीचे निदान आणि उपचार करण्यात आले आहेत. अत्याधुनिक ओसीटी मशिनची भर पडल्याने सदरचे केंद्र आता सर्व आवश्यक उपकरणांनी सज्ज झाले आहे. जॉलीबोर्ड लिमिटेडचे संस्थापक स्वर्गीय अरविंद जॉली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या केंद्राला आता “अरविंद जॉली डायबेटिक रेटिनोपॅथी सेंटर” असे नाव देण्यात आले आहे.

हे केंद्र आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असून विविध उपचार सेवा तर देत आहेच, त्याचबरोबर अनेकांसाठी एक आशेचे प्रतीक बनले आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी ही अशी आरोग्यस्थिती आहे, की त्यावर नियंत्रण न ठेवल्यास, रुग्णास अंधत्व येण्याची शक्यता असते. गोव्यामध्ये प्रमुख शहरातच हे केंद्र असल्याने अनेकांचे आयुष्य पुन्हा फुलवण्याची संधी उपलब्ध करते तसेच आरोग्याची स्थिती अती गंभीर होण्याचे टाळणेही या केंद्रामुळे शक्य होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराच्या माध्यमातून गोवा राज्याला पहिले शासकीय डायबेटिक रेटिनोपॅथी केंद्र भेट देता आले याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. या केंद्रामध्ये दरमहा सरासरी ४०० रुग्णांना उपचारसेवांचा लाभ मिळत आहे. रोग प्रतिबंध आणि प्रभावी उपचारसेवेची उपलब्धता करणे हे रोटरी इंटरनॅशनलच्या कार्यामधील प्राधान्य क्षेत्र राहिले आहे, तसेच टाळता येण्याजोग्या अंधत्व या समस्येवर उपचारसेवा उपलब्ध करण्याबाबत आमचे जिल्हा गव्हर्नर शरद पै यांचाही भर राहिला आहे. अरविंद जॉली डायबेटिक रेटिनोपॅथी सेंटरमुळे गोव्यातील हजारो मधुमेही रुग्णांना दृष्टी गमावण्यापासून वाचवण्यास सक्षम आहे. हा उपक्रम आपल्या राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांना बळकटी देणारा आणि निरोगी गोव्याच्या दिशेने एक पाऊल टाकणारा ठरेल असा आशावाद क्लबच्या अध्यक्ष रोटेरियन तन्वी अत्रेय सावंत यांनी व्यक्त केला.