Connect with us

गोवा खबर

हळर्णकर यांच्या हस्ते 21 व्या पशुगणनेचा शुभारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशात दर पाच वर्षांनी एकदा पशुगणना केली जाते. हा पशुधन डेटाचा मुख्य स्त्रोत आहे जो संपूर्ण राज्य आणि देशातील प्राण्यांच्या विविध प्रजातींची संख्या, जाती, वय आणि लिंग याबद्दल माहिती प्रदान करतो, अशी माहिती पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा सेवामंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी यांनी दिली.

सचिवालयातील त्यांच्या चेंबरमध्ये 21 वी पशुगणनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या पशुगणनेदरम्यान संकलित केलेली माहिती राज्य आणि देशातील पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल, असे हळर्णकर म्हणाले. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने आतापर्यंत 20 पशुधन गणना करण्यात आली आहे. ही 21वी पशुगणना असून ती यावर्षी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या 21व्या पशुधन गणनेत लक्ष केंद्रित करण्यात येणार्‍या प्रमुख क्षेत्रांवर प्रकाश टाकताना हळर्णकर यांनी पोल्ट्रीसह पशुधनाच्या 16 प्रजाती आणि 221 जातींची गणना केली जाईल, असे सांगितले. याशिवाय गुरे, म्हशी, उंट, शेळी, डुक्कर, गाढव, मेंढी खेचर, घोडा, कुत्रे, ससे, याक, हत्ती, पोनी, कोंबड्या, बदके आदींची गणना केली जाणार आहे.

हळर्णकर म्हणाले, आजपासून आम्ही राज्यात पशुगणना सुरू करत आहोत. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे अधिकारी राज्यातील प्रत्येक कुटुंबाला भेट देतील आणि राज्यभरातील प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असलेल्या मालकीच्या कुत्र्यांची आणि पशुधनाची तपशीलवार गणना करतील.

सरकारने आगामी 21व्या राष्ट्रीय पशुधन गणनेच्या दरम्यान कुत्र्यांचा जातीनिहाय डेटा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पशुधन गणनेमध्ये कुत्रे, पाळीव प्राणी तसेच भटक्या प्राण्यांची गणना समाविष्ट आहे. प्रगणक राज्यातील पाळीव प्राण्यांच्या मालकांकडे उपलब्ध असलेल्या विविध जातींच्या कुत्र्यांची स्वतंत्रपणे नोंद करतील, असे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन व पशुचिकित्सा सेवा खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, राज्य नोडल अधिकारी डॉ. राजेश केणी, डॉ. प्रकाश कोरगावकर, स्त्रीरोग विभागाचे उपसंचालक डॉ. शिरीषकुमार बेतकेकर आदी यावेळी उपस्थित होते.