गोवा खबर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले.
यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत हा उपक्रम संपन्न झाला. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी आणि भाविकांनी यात सहभाग घेतला.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो.