गोवा खबर : दरवर्षी भारतीय पत्रकारिता मंडळाच्या स्थापनाप्रित्यर्थ राष्ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्ताने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोवा संपादक मंडळ, गोवा पत्रकांर संघ, गोवा छायापत्रकार संघटना, इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्रकार संघटना, क्रीडा पत्रकार संघटना आणि दक्षिण गोवा पत्रकार संघटनेच्या सहकार्याने पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात राष्ट्रीय पत्रकारिता दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रिपोर्टिंगमध्ये नैतिकता आणि उत्तरदायित्व राखणे या विषयावर चर्चासत्र होईल. या चर्चासत्रात प्रसिध्द पत्रकार एलिस्टर मिरांडा, प्रसाद म्हांब्रे, न्यूटन सिक्वेरा आणि डॉ. ओलाव आल्बुकर्क भाग घेतील. ग्लेन कॉस्ता हे सत्राचे मॉडरेटर असतील.

यावेळी पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार आर. व्ही. प्रभुगांवकर यांना २०२४ वर्षाचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच ज्येष्ठ पत्रकार एलेक्झांडर मोनिज बार्बोझा, रामनाथ पै रायकर, सुशांत कुंकळ्येकर, प्रदीप पाटील आणि यशवंत पाटील यांचा पत्रकारितेतील योगदानासाठी सत्कार करण्यात येईल. तसेच छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात येईल.