गोवा खबर : सध्या गोवा ॲगमूट कॅडरखाली येत असल्याने अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि इतर केंद्रशासित प्रदेश मधून केंद्रीय सेवा अधिकारी या कॅडरमधून गोव्यात पाठविले जातात. मात्र या अधिकार्यांना गोव्याच्या संस्कृती आणि इतर व्यवहाराबद्दल काहीच ज्ञान नसल्याने ते गाेव्याला आवश्यक तो न्याय देऊ शकत नाहीत असा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून गोव्यासाठी स्वतंत्र आयएएस कॅडर स्थापन करावा अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून केली अाहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे संपर्क साधून हे बदल घडवून आणावेत अशी मागणी केली आहे.
ॲगमूट हा वेगवेगळ्या प्रदेशातील अधिकार्यांच्ाा समावेश असलेला कॅडर असल्याने या कॅडरचे अधिकारी त्यांच्या वैविध्यपूर्ण पोस्टिंगमधून जे वैविध्य आणि अनुभव आणतात त्याची आम्ही प्रशंसा करतो, परंतु अद्वितीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या राज्याच्या विपुल संधींचा पाठपुरावा करण्यासाठी गोव्याला स्वतःचे स्वतंत्र अधिकारी केडर असण्याची निर्विवाद गरज आहे. गोव्याची भाषा, संस्कृती, वारसा आणि कायदेशीर चौकट या संदर्भात एक वेगळी ओळख आहे, हे सर्व प्रतिसादात्मक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या कार्यासाठी अविभाज्य आहेत. तथापि, देशाच्या इतर भागांतून गोव्यात नियुक्त केलेल्या अधिका-यांना या गंभीर बाबींची माहिती नसते. बऱ्याच अधिकाऱ्यांची गोव्यात अल्प कालावधीसाठी बदली केली जाते, ज्या दरम्यान ते स्थानिक, सामाजिक व राजकीय वातावरणातील गुंतागुंत समजू शकत नाहीत. खेदाची गोष्ट म्हणजे, त्यांच्यातील लक्षणीय संख्या त्यांच्या पोस्टिंगच्या संक्षिप्ततेमुळे आपल्या राज्याच्या गुंतागुंतीबद्दल जाणून घेण्यात खरोखर रस घेत नाही.
गोव्याचा वारसा, तसेच तेथील कायदे आणि चालीरीतींशी परिचित नसल्यामुळे नोकरशाही आणि ते सेवा देणारे लोक यांच्यातील संपर्क तुटला जातो याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले अाहे.
काही अधिकारी, दुर्दैवाने, जनता आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दोघांबद्दल अहंकार आणि अनादर दाखवतात आणि स्थानिक लोकांपासून स्वतःला दूर ठेवतात. तर काहीजण दिल्लीतील त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होणार या भीतीने, सत्ताधार्यांना नाराज न करणारे निर्णय घेत सामान्य लोकांवर अन्याय करतात असे लक्षात आले आहे. त्यामुळे गोव्यासाठी स्वतंत्र आएएस, आयपीएस आणि आयएफएस कॅडर असणे अावश्यक अाहे. ज्यात स्थानिक अधिकारी, जे राज्याच्या गरजा आणि आकांक्षांबद्दल अधिक परिचित आहेत, ते गोव्याच्या दीर्घकालीन विकास उद्दिष्टांशी जुळणारे निर्णय घेण्यासाठी अधिक सुसज्ज असतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.