Connect with us

गोवा खबर

‘माझी बस योजना’ असूनही कदंब बस सेवा सुरूच ठेवणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : माझी बस योजना सुरू होऊनही कदंब बस सेवा सुरूच राहणार असल्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कदंब बस टर्मिनस, पणजी येथे कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेडच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन नवीन कदंब बसचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात कदंब महामंडळाच्या टीमचे अभिनंदन केले. लोकसेवेसाठी महामंडळाची बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी कदंब महामंडळ विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात ५०% सवलत देते, तर कर्करोगग्रस्त, एचआयव्ही रूग्ण आणि ४०% पेक्षा जास्त दिव्यागत्व असलेल्यांना कदंब बसमधून प्रवास करताना मोफत वाहतुकीचा लाभ घेता येतो असे त्यांनी सांगितले.

बसेसच्या कमतरतेमुळे कदंबला कोल्हापूर, पुणे, बंगळुरू आणि बेळगाव सारखे लांब पल्ल्याच्या, फायदेशीर मार्ग बंद करावे लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, हा निर्णय जनतेच्या फायद्यासाठी तोट्यात असतानाही छोट्या मार्गांवर सेवा देण्याचे महामंडळाची समर्पित सेवा दाखवून देते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली कदंब इलेक्ट्रिक बस सेवा जनतेला उत्कृष्ट सेवा देत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याची सरकारची योजना आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक अधिक वेळा वापरण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आणि यामुळे रस्ते अपघातांच्या घटना कमी होण्यास मदत होऊ शकते, असे  त्यांनी सांगितले.

कदंबचे अध्यक्ष उल्हास तूयेंकर यांनी आपल्या भाषणात चालक, वाहक आणि मेकॅनिकसह कदंब परिवार गेल्या ४४ वर्षांपासून पेडणे ते काणकोण तालुक्यातील जनतेची सेवा करत असल्याचे सांगितले . बसेसचा तुटवडा आणि बसस्थानकांची सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, परंतु सरकारकडून सातत्याने मिळणाऱ्या मदतीचे कौतुक केले.   तूयेंकर यांनी नियमांमुळे १५ वर्षांहून अधिक जुन्या सुमारे १०० बसेस रद्द कराव्या लागल्या, त्यामुळे १०० मार्गांवर तुटवडा निर्माण झाला. ५० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आणि ही उणीव भरून काढण्यासाठी दरवर्षी आणखी ५० बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी १५० इलेक्ट्रिक बसेसपैकी कदंबला ८७ प्राप्त झाल्या आहेत, उर्वरित ४३ बसेस डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहेत असे सांगितले.

तुयेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सेंट फ्रान्सिस झेवियरच्या आगामी शव प्रदर्शनासाठी सुमारे २० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती केली, ज्यामुळे या कार्यक्रमादरम्यान लोकांच्या सेवेत मदत होईल असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांसह कदंबच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याशिवाय, शालांत आणि उच्च माध्यमिकमध्ये उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या कदंबाच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.

सुरवातीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १९८०मध्ये खरेदी केलेल्या पहिल्या कदंब बसच्या GDX १ चे पूजन करण्यात आले.

कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री नारायण नाईक यांनी स्वागत केले.

याप्रसंगी कदंबचे उपाध्यक्ष  कृतेश नाईक गावकर,  व्यवस्थापकीय संचालक श्री पुंडलिक खोर्जुवेकर, संचालक मंडळ उज्वला नाईक, मधुकला शिरोडकर, बायो भंडारी व कदंबचे कर्मचारी उपस्थित होते.