गोवा खबर : पणजी स्मार्ट सिटीचे माजी व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ स्वयंदीप्त पाल चौधरी यांच्याविरोधात 82.87 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी दक्षता खात्याने एफआयआर नोंद केली आहे. त्यांना समन्स पाठवून चौकशी करावी, अशी मागणी पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी केली आहे.
मडकईकर म्हणाले, 1200 कोटी रुपये खर्च करून पणजीत स्मार्ट सिटीची कामे हाती घेतली आहेत. मात्र, एकूणच या कामांचा दर्जा पाहता ती दर्जाहीन दिसून येत आहेत. चौधरी हे स्मार्ट सिटीचे अधिकारी असताना या कंत्राटदार व सल्लागारांची नियुक्ती झाली होती. चौधरी यांनी या कामांमध्ये घोटाळा केल्याचा आपण वारंवार आरोप केला होता. या कामांचे ऑडिट करावे, ही मागणीही केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक, तसेच सीईओपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरसुद्धा चौधरी यांनी काही धनादेशांवर सही केली, तसेच स्मार्ट सिटीच्या कामांसाठी त्यांनी सल्लागारांची नेमणूक केली होती. यावरूनच हा घोटाळा हा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून, त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.