- राजकीय लाभ मिळवण्यासाठी भाजप म्हादईशी तडजोड
- पंतप्रधानांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश
गोवा खबर : कर्नाटकातील उल्लंघनाची दखल घेण्यात प्रवाह समिती अयशस्वी ठरल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बुधवारी भाजपच्या डबल इंजिन सरकारवर टीकास्त्र
सोडताना राजकीय लाभ मिळवण्यासाठी भाजपने ‘म्हादई’ नदीशी तडजोड केली असल्याचा आरोप केला.
आलेमाव म्हणाले, म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणच्या (प्रवाह) सदस्यांनी जुलैमध्ये गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक ठिकाणी म्हादईच्या पाण्याच्या प्रवाहाची पाहणी केली होती, परंतु कर्नाटककडून उल्लंघनाचे प्रमुख क्षेत्र असलेल्या कणकुंबी येथे तपासणी टाळली होती. यामुळे आता गोवा सरकारला प्रवाहला पुन्हा पत्र लिहिण्यास भाग पाडले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेहमी म्हादईच्या मुद्द्यावर ‘भिवपाची गरज ना’ असे म्हणतात. पण प्रत्यक्षात सर्वकाही याच्या उलट आहे. ही चिंताजनक बाब आहे की आमची म्हादई आधीच वळवली गेली आहे आणि राज्य सरकार काहीही करत नाही, असे आलेमाव म्हणाले.
म्हादईचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळवण्याचे काम पुन्हा सुरू केल्याबद्दल गोवा सरकार कर्नाटकविरुद्ध तिसरी अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी काहीच केले नाही. हे सरकार नुसते आश्वासन देत आहे, म्हादईच्या रक्षणाबाबत ठोस काहीही होत नाही. म्हादई कर्नाटकला विकण्यात भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेते गुंतले आहेत, यामुळे त्यांना राजकीय लाभ मिळतो, असा आरोप आलेमाव यांनी केला.
कर्नाटकने केलेल्या उल्लंघनांची नोंद घेण्यात प्रवाह अयशस्वी ठरल्याने राज्य सरकारला नवीन निवेदन लिहिणे भाग पडले आहे हे आता स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेस नेते युरी आलेमाव म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकारला आपल्या गोव्यातील इंजिनाची पर्वा नाही, हे धक्कादायक आहे. पण प्रमोद सावंत नेहमी आमची केस मजबूत असल्याचे सांगून लोकांना फसवतात, असे त्यांनी नमूद केले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यास प्रमोद सावंत का टाळत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांकडे नेण्यापासून कोण आणि का रोखत आहे? भाजप सरकारला कोणती गोष्ट लपवायची आहे, असा सवाल त्यांनी केला.
आलेमाव म्हणाले, दोन वर्षांपूर्वी सभागृह समिती स्थापन झाली असली तरी एकच बैठक घेण्यात आली, यावरून भाजप सरकार या विषयावर गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युरी आलेमाव यांनी भाजप सरकारला इशारा दिला की, म्हादईचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले तर काँग्रेस पुन्हा आंदोलन करणार.