Connect with us

गोवा खबर

पर्ये पंचायत सभागृह, कार्यालयाचे आमदार देविया राणे यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्ये मतदारसंघात आपल्याअडीच वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. काही कामे सुरू आहेत. आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत पर्ये पंचायत क्षेत्रात तीन नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी आपण आरोग्यमंत्री विश्वजीत राणे प्रयत्नशील आहे, अशी माहिती पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.

पर्ये पंचायतीच्या स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पंचायत कार्यालय व सभागृह इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, स्थानिक सरपंच रती गावकर, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, गटविकास कार्यालयांचे साहायक अभियंते वसंत परब, कनिष्ठ अभियंते राजेश दळवी, उपसरपंच आत्माराम शेट्ये, पंच हेमंत राणे, दत्ता राणे, उमेश राणे, लक्ष्मीकांत शिरोडकर, विदिशा गोसावी, अमिशा गावकर, कंत्राटदार प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन महिन्यांत महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी

मतदारसंघात येणाऱ्या पाच पंचायत क्षेत्रातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मोर्ले येथे १५ एमएलडी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. आगामी काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येईल. या भागातील युवावर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केरी येथे वेलनेस सेंटर उभारण्यात येईल. तसेच आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत पर्ये पंचायत क्षेत्रात भूमिका मंदिर परिसरात सुशोभीकरण, भव्य सभागृह, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा मैदान अशा तीन महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करून पुढील दोन वर्षांच्या काळात हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले.

पंचायत मंडळाच्या सहकार्याची गरज

आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत मंडळाच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे सरकारची अंत्योदय योजना सफल होऊन विकसित गोवा व विकसित भारत २०४७ हे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी पंचायत मंडळाच्या सदस्यांनी सक्रियपणे कार्य केले पाहिजे, आपल्या परिसरात स्वच्छतेला प्राधान्य देऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेऊन विकासाची कामे मार्गी लावली पाहिजेत. विकासकांना चालना देण्यासाठी सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघात सार्वजनिक कामांबरोबरच युवा पिढीचा वैयक्तिक विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी

जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर म्हणाले, पिसुर्ले पंचायतीच्या क्षेत्रात खाण कंपन्यांच्या व्यवसायामुळे सुमारे १६९ शेतकऱ्यांची ९० एकर जमिनीत असलेल्या शेतीची नुकसानभरपाई गेल्या १० वर्षांपासून मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सदर खाण कंपन्यांमध्ये सेसा गोवा, फोमेतो व दामोदर मंगलजी या तीन कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आमदार डॉ. राणे यांनी प्रयत्न करून सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

विकासकामे मार्गी लावण्यासाठी राणे यांचे सहकार्य

यावेळी वाळपई गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांनी सांगितले, सत्तरी तालुक्याच्या विकासात राणे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. तसेच आमदार डॉ. राणे यांचे विकासकामे मार्गी लावण्यासाठी बरेच सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे प्रकल्प उभे राहत आहेत. सदर प्रकल्प आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या योजनेचा माध्यमातून मिळालेल्या पन्नास लाख निधीतून उभारण्यात आला आहे. या चांगल्या वास्तूचे रक्षण करावे. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांमुळे बंद असलेल्या गुळेली पंचायतीच्या इमारतीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहेत, तोही प्रकल्प लवकर मार्गी लावणार आहे.

राजकीय इतिहासात महत्त्वाचा मतदारसंघ

होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी सांगितले, पर्ये मतदारसंघाचे माजी आमदार प्रतापसिंह राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व विद्यमान आमदार डॉ. देविया राणे यांच्या प्रयत्नांमुळे पर्ये मतदारसंघ हा एक आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आला आहे. त्यामुळे राजकीय इतिहासात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून कायम राहील आहे.

यावेळी पंचायतीच्या वतीने इमारत बांधकाम कंत्राटदार प्रशांत नाईक, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, सहायक अभियंते वसंत परब, कनिष्ठ अभियंते राजेश दळवी यांचा आमदार डॉ. राणे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच रती गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गणपुले हिने केले. पंच दत्ता राणे यांनी आभार व्यक्त केले.