Connect with us

गोवा खबर

इमारत धोकादायक असल्याने पणजी मच्छी मार्केटमधील १२ दुकाने मनपाकडून ‘सील’

Published

on

Spread the love
गोवा खबर : येथील मच्छी मार्केटची धोकादायक बनलेली इमारत महानगरपालिकेने खाली केली असून, तेथील १२ दुकाने बुधवारी सील करण्यात आली. दिलेली मुदत उलटूनही दुकाने खाली केली जात नसल्याने मनपाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कारवाई केली. 
सदर इमारत धोकादायक बनली असून, ती जमीनदोस्त केली जाणार आहे. या इमारतीत चिकन, मटण, तसेच मांस विक्रीची सुमारे १० ते १२ दुकाने आहेत. सदर दुकाने बुधवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खाली करावीत, असे मनपाकडून दुकानदारांना मंगळवारी सांगितले होते. मात्र, अनेक दुकानदारांनी ती खाली न केल्याने अखेर मनपानेच ती सील केली आहेत.
दुकाने खाली केल्यानंतर ती अन्य जागेत स्थलांतरित केली जातील, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले होते. मात्र मनपाने आम्हाला अजूनही नवी जागा दिलेली नाही. त्यामुळे आम्ही दुकाने खाली केली नव्हती. आता अचानक आमची दुकाने बंद केल्याने आमच्या व्यवसायाचे काय, असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला.
शहरातील काही धोकादायक तसेच असुरक्षित इमारतींची यादी मनपाने तयार केली आहे. यात या मच्छी मार्केटमधील इमारतीचा समावेश आहे.
ही इमारत पाडली जाणार असल्याने तेथील दुकाने खाली करावीत, असे निर्देश मनपाकडून दुकानदारांना बऱ्याच महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र मनपाने ही 1 दुकाने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी जागा न दिल्याने दुकाने सुरूच होती. अखेर बुधवारी ही दुकाने मनपाने सील केली. त्यामुळे दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.