- तक्रारीनंतर ‘ती’ वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली
गोवा खबर : मोरजी येथील ‘फोक्सोसो ला बीच रिसॉर्ट’मध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित ‘दही हंडी’कार्यक्रमात बियर प्राशन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. याविषयी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २१ ऑगस्ट या दिवशी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली. ‘रिसॉर्ट’चे संचालक जगदीश प्रजापती यांनी मांद्रे पोलीस ठाण्यात येऊन संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवून कार्यक्रम रहित केल्याचे सांगून हिंदूंची व्यवस्थापनाच्या वतीने क्षमा मागितली.
पोस्टमध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या शिष्टमंडळाने मांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांची भेट घेऊन ‘रिसॉर्ट’चे विज्ञापन आणि कार्यक्रमाचे आयोजन यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांनी त्वरित ‘रिसॉर्ट’च्या संचालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या वेळी ‘रिसॉर्ट’चे संचालक प्रजापती यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या समोर व्यवस्थापनाच्या वतीने सर्वांची क्षमा मागितली आणि कार्यक्रम रहित केल्याचे सांगितले आणि यापुढे असा कार्यक्रम ठेवणार नाही, अशी हमी दिली.
या वेळी शिष्टमंडळामध्ये हिंदुत्वनिष्ठ सलील बांदेकर, सूजन नाईक, सूरज चोडणकर, विनोद वारखंडकर, स्वरूप नाईक, विनायक च्यारी, अजित नागराज, सुनीता नागराज, उज्ज्वला गाड, हविता शेटगावकर, आरती फडते, गजानन पेडणेकर, हिंदू जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या राजश्री गडेकर, हिंदू जनजागृती समितीचे अंकुश नाईक, शिवा परब, सनातन संस्थेच्या शुभा सावंत आदींची उपस्थिती होती.
पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर शिष्टमंडळाने मोरजी पंचायतीचे सरपंच मुकेश गडेकर यांची भेट घेतली. गडेकर यांनी ‘संबंधित ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने हिंदूंची सार्वजनिकरित्या क्षमा मागण्यासंबंधीचा व्हिडिओ पाठवावा, यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.