Connect with us

गोवा खबर

हडफडेत आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love
गोवा खबर: सर्व लोकांना मोफत वैद्यकीय सेवा देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. आगामी काळात आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारात कशी पोहोचेल, असा प्रयत्न सरकार करीत आहे. हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला जात आहे. कांदोळी येथील उप आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ते कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणून सुरू केले जाईल. या आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हडफडे येथे दिले.
मंत्री राणे म्हणाले , आमदार मायकल लोबो हे खरोखरच धडाडीचे आमदार आहेत. त्यांना जे वाटते ते सडेतोडपणे बोलून दाखवतात. जनतेसाठी ते सतत उपलब्ध असतात. त्यांच्या मागणीनुसार या उपआरोग्य केंद्राला लवकरच एक पूर्णवेळ डॉक्टर्स उपलब्ध करून दिला जाईल.
व्यावसायिक सामाजिक बांधिलकीतून हडफडे येथे सुरू केलेल्या आयुष्य उपकेंद्राचे उ‌द्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मायकल लोबो, आरोग्य संचालिका डॉ. रूपा नाईक, हडफडेचे सरपंच रोशन रेडकर, उपसरपंच व इतर पंच सदस्य, हडफडे कोम्युनिदादचे अॅटर्नी अॅश्ली डिसोझा, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, कांदोळी उपआरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नजारेथ, पर्राचे सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डॅनियल लोबो इतर पंच सदस्य, कळंगुटचे पंच सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य उपकेंद्रासाठी ३९ लाख खर्च आल्याचे सांगण्यात आले.
गोव्यातील जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी गावोगावी सुरू केलेल्या उपकेंद्राचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. या केंद्रातून प्राथमिक आरोग्याच्या सुविधा पुरवण्याबरोबरच प्राथमिक स्तरावरील यंत्रसामग्रीही पुरवण्याची गरज आहे. आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने बाहेरील अन्न खाणे शक्यतो टाळावे, अन्यथा आजारांना सामोरे जावे लागेल. घरचे अन्न खा व स्वस्थ राहा, असा सल्ला आमदार मायकल लोबो यांनी यावेळी दिला.
पर्राचे उपसरपंच डॅनियल लोबो यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची रेखाटलेली तसबीर भेट दिली. सुरुवातीला सरपंच रोशन रेडकर यांनी उस्थितांचे स्वागत केले. यावेळी आरोग्य संचालिका डॉ. रूपा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.