गोवा खबर : गोव्यातील ज्या मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जायचे आहे, त्यांनी यासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी दिली.
गोव्यातील लोकांना हज यात्रेसाठी प्रति व्यक्ती केवळ 3.21 लाख रुपये खर्च येतो, आणि इतर राज्यांच्या तुलनेत ही रक्कम बरीच कमी आहे, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले.

उर्फान मुल्ला
गोव्यातून सरासरी 170 हज यात्रेकरू हज यात्रेला जातात. मात्र, हा आकडा 300 पर्यंत पोहोचल्यास गोव्यातून थेट विमानाची व्यवस्था करणे शक्य आहे, असे मुल्ला यांनी सांगितले. गेल्या वर्षी 162 यात्रेकरू हज यात्रेला गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारने हज यात्रेच्या नियमांमध्ये शिथिलता देऊन मेहरमच्या कलमाचे रद्द केले आहे. त्यामुळे आता महिलांना एकट्याने हज यात्रेला जाण्याची मुभा आहे, असे मुल्ला यांनी सांगितले. गोवा राज्य हज समितीसाठी सरकारने स्वतंत्र विशेष सचिव नियुक्त करावा, ज्यामुळे हज यात्रेची प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. अनुदान वाढवण्याची मागणीही त्यांनी केली. सध्या फक्त 30 लाख रुपये अनुदान सरकार देते. तसेच हज यात्रेकरूंसाठी व्यवस्था करण्यासाठी हा निधी अपुरा पडतो, असे त्यांनी सांगितले.