गोवा खबर : ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमिक शाळा ते उच्च माध्यमिक शाळेपर्यंतच्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि रोबोटिक्सचा समावेश करणारे पहिले राज्य म्हणून गोवा आघाडीवर आहे असे सांगितले. शहरातील जुन्या सचिवालयात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात तिरंगा ध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२४ पर्यंत १०० टक्के साक्षरता साध्य करण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आणि शिक्षणात एसटीईएम, एआय आणि रोबोटिक्समध्ये प्रगती करण्यावर सरकारचा भर आहे असे सांगितले.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व आयटीआय आयएसओ-प्रमाणित आहेत असे सांगितले आणि राज्य सरकारने पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान वाढविण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे असे ते म्हणाले. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सौर तंत्रज्ञान, अग्निशमन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा आणि आदरातिथ्य व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

राज्याच्या आर्थिक क्षेत्रात पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्व तरुणांना उद्योग क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले आहे.
खाजन शेती पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी गोवा खाजन विकास आणि संवर्धन मंडळाच्या आगामी स्थापनेची घोषणा केली. गोवा पशुवैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यातील शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने गोवा जमीन महसूल संहितेमध्ये बदल करून त्यांची विक्री रोखली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेने सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये कॅन्टीन आणि खानपान सेवा व्यवस्थापित करण्यासाठी स्वयं-सहाय गटांमध्ये (एसएचजी) महिलांसाठी नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत.
राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण २०२३ मध्ये ८६.२९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे प्रतिपादून मुख्यमंत्र्यांनी पर्यटक आणि रहिवासी दोघांच्याही सुरक्षेसाठी पोलीस दल बांधिल असल्याचे सांगितले.
विकसित भारत २०४७ कडे पाहता, विकसित राष्ट्र बनण्याच्या आणि पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्याच्या देशाच्या वाटचालीत गोवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांनी काढला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालक नितीन रायकर यांना प्रदान करण्यात आले तर जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४, वाळपईचे साहिल भिसो लाड यांना प्रदान करण्यात आला. पीआय अरुण बाकरे आणि एएसआय महेश सावळ यांना सार्वजनिक प्रशिक्षणात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाले.

स्वातंत्र्यसैनिक सुरेश सुब्राय्या परोडकर कुंभारजुआ, फोंडा येथील स्व. परशुराम एस. शहापूरकर, स्व. पांडुरंग सगुण कुंडईकर, स्व. पुरुषोत्तम (पुरसो) चालू सावंत आणि डिचोलीचे स्व. वासुदेव यशवंत कुबल यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
एनआयसी गोवाचे तांत्रिक संचालक केव्ही रामनाथन यांना मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उप वनसंरक्षक वन विभाग, (संशोधन आणि उपयोग) तेजस्विनी पुसुलुरी, आयएफएस, मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस आणि उपजिल्हाधिकारी (डीआरओ) जिल्हाधिकारी कार्यालय (दक्षिण), विनायक चारी यांना प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वयंपूर्ण गोवा (सासष्टी २) अंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुका नोडल अधिकारी म्हणून गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव वेनान्सियो फुर्तादो यांना गौरविण्यात आले.

पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज आर. वागळे, वाहतूक खात्याचे अतिरिक्त संचालक संदीप बी देसाई, राज्य कर अधिकारी मेलविन फालेरो आणि वन खात्याचे सहाय्यक वनसंरक्षक दामोदर सालेलकर यांना सर्वोत्कृष्ट कार्य करणारे स्वयंपूर्ण मित्र म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कामगार, महसूल आणि कचरा व्यवस्थापन मंत्री अतानासिओ मोन्सेरात, वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोनाचे आमदार कार्लोस फरेरा, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, आयएएस, विविध आयएएस सचिव, आमदार, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.