गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो-गोवा येत्या 14 ते 18 ऑगस्ट या कालावधीत 78 व्या स्वातंत्र्य दिन 2024 चे औचित्य साधून मडगाव रेल्वे स्थानकावर विविध संकल्पनांवर आधारित पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रदर्शनात देशाच्या फाळणी काळातील भयावहतेची अनुभूती देणारे पुनर्संचयित आभासी वास्तव, नव्या फौजदारी कायद्यातील बदलांची माहिती देणारे संवादात्मक प्रदर्शन आणि इतर दृक-श्राव्य कार्यक्रमांव्यतिरिक्त भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित केली जातील. या कार्यक्रमात नशा मुक्त भारत अभियानावरील सृजनात्मक डिजिटल आशयही प्रदर्शित केला जाईल.
हे प्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.
16 ऑगस्ट रोजी दक्षिण गोवा जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
