Connect with us

गोवा खबर

सनबर्न आयोजकांविरुद्ध पालेकर यांनी केली तक्रार दाखल; शासनाकडून कारवाईची मागणी 

Published

on

Spread the love
गोवा खबर : सरकारकडून आवश्यक परवानगी न घेता सनबर्नचे आयोजक कार्यक्रमाची तिकिटे ऑनलाईन विकत आहेत. हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी शनिवारी पणजी पोलिस ठाण्यात सनबर्नच्या आयोजकांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. 
या प्रकरणाची एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी पालेकर यांनी सरकारकडे केली आहे. तसेच तिकिट विक्रीतून मिळणारा महसूल कोठे जातो याचा पोलिसांनी तपास करावा आणि हा निधी मिळवणाऱ्या कंपनीची ओळख पटवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने सनबर्न आयोजकांना कोणतीही परवानगी दिली नसल्याचे विधान केले होते. असे असताना ‘बुकमायशो’ यांच्याद्वारे तिकिटे विकली जात आहेत. आतापर्यंत अनेकांनी ती खरेदी केली आहेत. त्यामुळे आयोजकांवर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची आहे, असे पालेकर यांनी सांगितले.
पालेकर म्हणाले, ‘बुकमायशो’ आणि सनबर्नच्या आयोजकांकडून सुरू असलेला लुटीचा आणि कारस्थानाचा प्रकार चिंताजनक आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून पोलिसांना तपास करण्याचे आदेश द्यावे. याशिवाय लवकरात लवकर एफआयआर दाखल करून तिकिटांची विक्री थांबवावी. असे न केल्यास सरकारचाही यात सहभाग असल्याचे स्पष्ट होईल.
पालेकर यांनी हेही अधोरेखित केले की गेल्या वर्षी सनबर्न आयोजक ३१ डिसेंबर या दिवशीची परवानगी नसतानाही ३१ डिसेंबरला होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलची तिकिटे विकत होते. अखेरीस 31 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि आयोजकांनी दोन महिन्यांनंतर जनतेचे पैसे परत केले. यावरून असे दिसून येते की आयोजक हे नेहमीचे गुन्हेगार आहेत ज्यांना हे समजले आहे की सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. आवश्यक परवानगी न मिळालेल्या कार्यक्रमाचा आयोजक प्रचार करत आहेत, जे कायद्यानुसार गुन्हा आहे.
पालेकर म्हणाले, पर्यटन मंत्र्यांनी स्वतः सांगितले होते की, सरकारने सनबर्नला परवानगी दिलेली नाही आणि ज्याला तिकीट विकले गेले असेल ते पोलिस तक्रार करू शकतात. मला सनबर्न आयोजकांच्या फसव्या कारवाया उघड करायच्या होत्या, म्हणूनच मी तिकीट खरेदी केली. त्यांनी माझ्याकडून 2,230.10 रुपये फसवेगिरीने घेतले आहेत.
राज्यातील भाजप सरकार सासरेबुवा आणि सनबर्न फेस्टिव्हलचे प्रवर्तक त्यांचे आवडते जावई आहेत. जावईकडून एक मोठी भेटवस्तू मिळवण्यासाठी हे सासरे शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात. त्यामुळेच परवानगी देण्यासाठी विलंब केला जातो. एक मोठी भेटवस्तू मिळवल्यानंतर अखेरीस परवानगी देणे हे सरकारचे दरवर्षीचे वागणे झाले आहे. सनबर्नने गोव्याला जगात संस्कृतीच्या नकाशावर नाही तर मोठ्या आवाजाच्या, मादक पदार्थांचे सेवन, प्रदूषणाच्या नकाशावर आणले आहे, असा टोला पालेकर यांनी हाणला.