Connect with us

गोवा खबर

फेस्तानिमित्त गोवा-वालंकणी प्रवासी रेल्वे सुरू करा : खासदार विरियातो फर्नांडिस 

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्यातून 27 ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत तामिळनाडू येथील वालंकाणी येथे जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी खास प्रवासी रेल्वे सेवा सुरू करा, अशी मागणी दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नाडिस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
खासदार विरियातो यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले. मंत्र्यांनी खास प्रवासी रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती विरियातो यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात तामिळनाडू वालंकाणी चर्चमध्ये होणाऱ्या फेस्तानिमित्त भाविक तेथे जाण्यासाठी निघतात. त्यामुळे गोव्यातून वालंकाणीला जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत खास प्रवासी रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार विरियातो यांनी केली.
फेस्ताच्या निमित्ताने राज्यातून खिस्ती बांधव मोठ्या संख्येत तेथे दर्शनासाठी जातात. वालंकाणी येथे होणाऱ्या फेस्तानिमित्ताने २९ ऑगस्टपासून प्रार्थना सभांना सुरुवात होत असून २७ ऑगस्टपासूनच गोव्यातून शेकडो भाविक त्यात भाग घेतात.
रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी खासदार विरियातो यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर वालंकाणीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. वालंकाणीला जाण्यासाठी अतिरिक्त खास प्रवासी रेल्वे सेवेची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी झाल्यानंतर मी पुढाकार घेऊन रेल्वे मंत्र्यांना निवेदन सादर केल्याचे विरियातो यांनी सांगितले.