Connect with us

गोवा खबर

मसुदा खुला ठेवल्याने पर्यटनमंत्री खंवटेंचे कौतुक

Published

on

Spread the love
  • पर्यटनमंत्र्याकडून आदर्श उदाहरण : आलेमाव
गोवा खबर : गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन प्रस्तावित विधेयकाचा मसुदा लोक सूचनांसाठी खुले ठेवण्याच्या पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या निर्णयाचे गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी कौतुक केले. या निर्णयाने त्यांनी एक आदर्श उदाहरण समोर ठेवल्याचे आलेमाव म्हणाले.
प्रश्नोत्तर तासाला वरील विधेयकासंबंधीचा तारांकीत प्रश्न आलेमांव यांनी पुकारला होता. मूळ प्रश्नावर उपप्रश्न करताना आलेमाव म्हणाले , या विधेयकाचा मसुदा तयार होताच आमदारांचीही त्यांनी एक बैठक बोलावली. त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. सर्वाना विश्वासात घेऊन या गोष्टी पुढे जाणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या संस्थेबाबत बोलताना आलेमाव यांनी संस्थेने १ कोटी ३७ लाख रूपये बिल सादर केल्याचा दावा केला, त्याला खंवटे यांनी आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अर्धवट माहितीच्या आधारे चुकीचा आरोप करत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात या संस्थेने केवळ ३५ लाख व अन्य खर्च मिळून एकूण ४१ लाख रूपयांचे बिल सादर केल्याचे सांगितले. दुसर्या टप्प्यातील बिल अद्यापही संस्थेने सादर केले नसल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.
राज्यात शेती व खाण व्यवसाय ठप्प झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्त्रोत ठरला आहे. अशा प्रसंगी पर्यटनाला योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. प्रस्तावित विधेयकाच्या माध्यमातून हा प्रयत्न होत असला तरी सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून हे विधेयक तयार करण्यात यावे अशी मागणी आलेमाव यांनी केली.
पर्यटनमंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले की, विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेली संस्था ही गोवा पर्यटन मंडळाच्या मान्यतेनंतर असून आलेमाव यांनी उगाच संस्थेच्या नियुक्तीवरून बाऊ करू नये. पर्यटन क्षेत्राचा विकास व विस्तार करण्यासाठी सुयोग्य विधेयक गरजेचे आहे. या क्षेत्रातील काही बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी देखील परिपूर्ण विधेयकाची गरज भासत होती. त्यामुळेच नवी संस्था रितसर नेमून त्यांच्यामार्फत विधेयकाचा मसुदा तयार केल्य़ाची माहिती खंवटे यांनी दिली.
पर्यटन उद्योगातील सर्व दावेधारकांची मते विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या या विधेयकाचा मसुदा लोकसूचनांसाठी अलीकडेच खुला ठेवण्यात आला होता. ३३ बैठकांच्या आयोजनामधून आलेली मते व सूचनांच्या आधारे हा मसुदा तयार करण्यात आला आहे.