गोवा खबर : कोरगाव येथील कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात 11 वी वाणिज्यमध्ये शिकणार्या दक्ष पोळजी या विशेष विध्यार्थ्याला मांद्रे युवक काँग्रेसतर्फे नुकतीच 14 महिन्यांच्या रिचार्जसह वायफाय सेवा प्रदान करण्यात आली. दक्षने सीए होण्याची इच्छा बोलून दाखवली त्यावेळी काँग्रेस पदाधिकार्यांनी त्याला शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी विजय भिके, प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी सदस्य प्रमेश मयेकर, प्रदीप हरमलकर, मांद्रे युवक काँग्रेस अध्यक्ष नाईक, अमोल राऊत उपस्थित होते.
भिके यांनी दक्षची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना दात्यांना मदतीचे आवाहन केले.

दक्षने दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवले आहेत. आता त्याने उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला असून त्याला घरातून शाळेत येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र चारचाकी गाडीची आवश्यकता आहे. त्याचे काका त्याला शाळेत घेऊन जातात व त्याच्याबरोबर संपूर्ण दिवसभर राहतात. त्यासाठी भाड्याच्या गाडीला त्याला किमान महिन्याला 15 हजार खर्च आहे. सध्या हा खर्च शाळेमार्फत केला जातो. दक्षच्या वडिलांचा पाय कापण्यात आला असून ते 60 टक्के अपंग आहेत. बहीण प्रशिक्षणार्थी म्हणून सरकारी सेवेत आहे. तिचे प्रशिक्षण दोन महिन्यात संपणार आहे. तिला कायमस्वरूपी नोकरीची गरज आहे. तिची आई घरकाम करते. त्यांना किरकोळ मदत मिळते. दक्षला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.
दक्षने वायफाय सेवा दिल्याबद्धल मांद्रे युवक काँग्रेसचे आभार मानले. प्रज्ञा हायस्कूलमध्ये असताना मुख्याध्यापिका पी. एस. मिनी तर आता कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रा. जुही थळी व अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले.
प्रदीप हरमलकर यांनी दक्षचे अभिनंदन करत त्याला आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.