- 22 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित : आरोलकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
गोवा खबर : पेडणे तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुये येथे सरकारी जमिनीत इलेक्ट्रॉनिक्स सिटी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे. या प्रकल्पाकडे येणारा धारगळ सुके कुळण ते इलेक्ट्रॉनिक्स सिटीपर्यंतचा किमान साडेतीन किलोमीटर लांबीचा लिंक रस्ता एकूण 22 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अधिकार्यांसोबत एक बैठक झाल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीकडे जाणारा लिंक रस्ता पूर्ण झाला नसल्याने मोठ्या कंपन्या किंवा वाहतूक या प्रकल्पापर्यंत पोहोचण्यास अडथळे येत होते. त्यासाठी लिंक रस्ता आवश्यक होता. सुरुवातीला जो लिंक रस्ता नियोजित केला होता त्या ठिकाणी एका जमीनदाराने आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल करून नव्याने पुढील प्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री, आयटी अधिकारी, उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती, असे आरोलकर यांनी सांगितले.

तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पातून किमान 1,800 जणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्या अनुषंगाने नुकतीच इलेक्ट्रॉनिक माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री तथा पर्यटनमंत्री रोहन खवटे यांच्यासोबतही बैठक झाल्याची माहिती आरोलकर यांनी दिली.