Connect with us

गोवा खबर

जिल्हाधिकार्‍यांनी पाण्यात उतरून घेतला मयते-अस्नोडा येथील पुराने वेढलेल्या घरांचा आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका मयते-अस्नोडा येथील 10 ते 12 घरांना बसला. या घरांमध्ये 20 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पुराचे पाणी घरात घुसले होते. गुरुवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांनी पाण्यात उतरून पाण्याने वेढलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी मामलेदार आणि खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.

वनदेवी मंदिराकडे जाणार्‍या मार्गावार मीटरभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंती मातीच्या असल्याने त्या फुगून कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळी पाण्याची पातळी कमी होती. त्यानंतर ती हळूहळू वाढत गेली. स्थानिक आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिलेली आहे. या नदीकाठी असलेल्या घरांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

स्थानिक रहिवाशी दयानंद शिरगावकर यांनी सांगितले, सरकारने पार नद्यांतील गाळ उपसा करायला हवा होता. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाळाबरोबरच लहान दगडही वाहून येतात. हा गाळ पार नदीत साठतो, त्यामुळे पाण्याची पातळी वाढते. आमच्या घराच्या भिंती मातीच्या असल्याने भीती वाटते.

पाणी भरल्याने लोकांचे हाल होतात. नदीकाठी संरक्षक भिंत उभारून वस्तीमध्ये येणारे पाणी रोखावे, अशी मागणी हनुमंत नार्वेकर यांनी केली.