इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत
महिला सशक्तीकरणाची योजना ३० सप्टेंबरपर्यंत सुरू
गोवा खबर: माहिती तंत्रज्ञान खात्याच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून आयटी क्षेत्रात येत्या काही दिवसात २ ते ३ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध
होतील, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मंत्री रोहन अ. खंवटे यांनी आज गोवा विधानसभेत केली. महिला सशक्तीकरणासाठी माहिती केंद्र योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण खात्याच्या सभागृहात मांडलेल्या आर्थिक अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खंवटे बोलत होते. इ डिस्ट्रीक्ट मोड्युल चालू केल्यानंतर त्याखाली ४१ खात्यांच्या २४१ सेवा चालू केल्या. आज त्याचे ७ लाखावर वापरकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले. २८ लाखावर ट्रान्सेक्शन्स त्याखाली झाल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
तुमची योजना जाणा, खाली २१ खात्यांच्या २०० हून अधिक सेवा उपलब्ध केल्या आहेत. राज्यात ५५६ सीएससी केंद्रामधून सरकारी सेवा जनतेच्या दारी पोचल्या आहेत.
सर्वोत्तम सेवा योजनेखाली ग्रामीण मित्रांची नियुक्ती करून गावातील या सामान्य लोकांसाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली. डिजीलॉकर सेवादेखील या खात्याने उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
३ डी प्रिंटींग मध्ये करियरच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गाला या कामात प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. जीआयएस सर्व सरकारी खात्यांमध्ये लागू करण्याचा विचार असून त्यामुळे लोकांना नव्या सुविधा उपलब्ध होतील असे खंवटे म्हणाले.
जीबीबीएन बाबत अनेक आरोप झाले. पण त्या बाबतची संपूर्ण माहिती सदस्यांनी जाणून घ्यायला हवी असे सांगून जीबीबीएन १ व २ खाली एकूण सुमारे दीड हजार लोकेशन्स कव्हर करण्यात आली. मात्र त्यांचा २०१९ मध्ये कंत्राट संपताच केवळ केबल नव्हे तर संपूर्ण सामुग्री हस्तांतरण करता येत नव्हती. त्यामुळे अडचण निर्माण झाली. म्हणून वार्षिक देखभाल संस्था नेमावी लागली. त्यामुळे खर्च करणे अपेक्षित होते असे खंवटे यांनी सांगितले.
वेगवेगळ्या खात्यांसाठीची इ ऑफिस योजना लागू करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर एक दोन कार्यालये घेऊन पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयटी व स्टार्ट अप धोरणाखाली गोव्यात २०० हून अधिक स्टार्ट अप तयार झाले. त्यातील ३० टक्के हे महिलांनी सुरू केलेले स्टार्ट अप असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. महिला सशक्तीकरणासाठीचे आयटीचे हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
गोवा डिजीटल नॉमेडससाठी योग्य जागा आहे. सध्या गोव्यात ३०० हून अधिक डिजिटल नॉमेडस कार्यरत आहेत. डिजिटल नॉमेडसच्या सुविधा निर्माणासाठी सल्लागाराची गरज आवश्यक होती. त्यासाठी सल्लागार नेमल्याचे सांगून आश्वे, मोरजी येथे सुविधा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पणजीच्या जुन्ता हाऊस इमारतीत छपाई व मुद्रण खात्याच्या गोदामाचे काँ वर्कींग स्पेसमध्ये रूपांतर करण्यात आले असून लवकरच त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती जमातीसाठीची संगणक योजना बंद केली कारण त्याचा योग्य वापर होत नव्हता. ज्यांना हे संगणक दिले जात होते ते प्रशिक्षणासाठी येतच नव्हते हे लक्षात आल्यानंतर सध्या बंद ठेवली असून अभ्यासक्रमातही सुधारणांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
सत्ताधारी गटातर्फे आमदार जेनिफर मोन्सेरात, प्रेमेंद्र शेट, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मायकल लोबो, गणेश गांवकर, कृष्णा साळकर, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, दिगंबर कामत, निलेश काब्राल, जोशुआ डिसोझा यांनी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण खात्याच्या चर्चेत सहभागी होत अनेक महत्वाच्या सूचना सरकारला केल्या. व्हाय फाय स्पॉटस् लवकर सूरू व्हावेत अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह आमदार कॅ. व्हॅन्झी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, एल्टन डिकॉस्ता, क्रुझ सिल्वा, विजय सरदेसाई, यांनीही आर्थिक मागण्यावरील चर्चेत सहभाग घेतला. विरोधकांनी आयटी खात्यासंबंधी विविध महत्वाच्या सूचना व शिफारशी सरकारला केल्या. व्हिएगस यांनी रोबोटीक कॅम्पसच्या आयोजनासाठी आयटी मंत्री खंवटेंचे कौतुक केले. पीएम वाणी योजना अंमलात आणण्याची सूचना वजा मागणी विरोधी सदस्यांनी केली.
डिजीटल नॉमेडससाठी आवश्यक सुविधा, इंटरनेट सप्लाय कंपन्यांचा रस्त्यावरील खुल्या वायर्सचा गोतावळा, याकडे लक्ष देण्याची गरज सभागृहातील चर्चेवेळी आमदारांच्या भाषणातून समोर आली. ग्रामीण भागातील नेटवर्क व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे मत बहुतेक सदस्यांनी व्यक्त केले. व्हाय फाय स्पॉट लवकरच चालू करण्याची मागणीही त्यांनी केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीसाठी गोव्याने सज्ज राहावे असे आवाहनही विरोधी सदस्यांनी बोलताना केले.