गोवा खबर:वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातील सिद्धांतांचा अभ्यास करून या विज्ञानाची पवित्रता कायम राखावी तसेच या क्षेत्रातील तज्ञ चिकित्सक यांच्याशी चर्चा करून आयुर्वेद क्षेत्रातील नव संशोधनांकडे सुद्धा वळावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज वर्धा येथे केले. वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा १५वा दीक्षान्त समारोहाला संबोधित करताना ते आज बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, कुलगुरू डॉ.ललित वाघमारे नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर प्रामुख्याने उपस्थित होते. दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ तसेच नागपूर येथील आयुष मंत्रालय अंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान आणि अनुसंधान परिषद -सीसीआरएएस या संस्थाद्वारे सिकलसेल अॅनिमिया यावर संशोधन प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प सिकलसेल वर उपचार तसेच सिकल सेलग्रस्त रुग्णांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असे देखील प्रतापराव जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षांत समारोहात वैद्यकीय, दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार, परिचर्या, औषध निर्माणशास्त्र, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील 1 हजार ७२१ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षांत प्रमाणपत्र प्राप्त केले.
विविध शाखेच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ७८ विद्यार्थ्यांना ११५ सुवर्ण, ७ रौप्य तर १३ कुलपती विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यात वैद्यकीय शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी यश चिराग पारेख हा सर्वाधिक १० सुवर्णपदकांसह एकूण १५ पुरस्कारांचा मानकरी ठरला.
या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांसह पालकवृंद आणि विद्यापीठाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.