Connect with us

गोवा खबर

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत नावनोंदणी करण्यास प्रवृत्त करा : गावडे

Published

on

Spread the love

गोवा खबर : विद्यार्थी समुदायाने उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विध्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सक्रियपणे नावनोंदणी करण्यासाठी अधिक प्रवृत्त केले पाहिजे ज्यामुळे हे विद्यार्थ्यी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्याबरोबरच देशाच्या विकासाला योगदान देतील, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

काल बांबोळी येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गावडे यांनी महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये एनएसएसच्या चांगल्या अंमलबजावणीच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएसएस सुरू करण्याच्या शक्यता तपासण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण होईल ज्यामुळे त्यांना विविध कौशल्ये विकसित करता येतील. राज्यातील एनएसएसच्या बळकटीकरणाच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा करून एनएसएससाठी स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी आणि नावनोंदणी करण्यासाठी विविध प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्रीडा व युवा व्यवहार संचालक अरविंद खुटकर यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. राज्यातील एनएसएसचे वार्षिक उपक्रम, उपलब्धी आणि योजनाही त्यांनी सादर केल्या.

मंत्री गावडे यांनी एनएसएसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि प्रचारासाठी स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना समर्पित भावनेने काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध सूचना दिल्या.

या बैठकीला महाराष्ट्र आणि गोवा, एनएसएस विभागाचे संचालक अजय शिंदे, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उच्च शिक्षण खात्याचे अतिरिक्त संचालक प्रा. गेर्वासियो मेंडीस, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक गणराज मोरजकर, उच्च माध्यमिक प्राचार्य मंचाचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ आणि एनएसएस समन्वयक, गोवा विद्यापीठ डॉ. नितीन सावंत उपस्थित होते.