डॉ. सावंत, तानावडे, विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
गोवा खबर:भारतीय जनता पार्टीला जे कार्यकर्ते लाभले आहे तसे कार्यकर्ते कुणालाही मिळणार नाही. पार्टीच्या जडण-घडणीत त्यांनी जो त्याग केलेला आहे, त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पढतील. भाजपाच्या यशाचे सारे श्रेय त्यांनाच जाते, असे केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी प्रतिपादन केले.
श्रीपाद नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला. श्री. नाईक सलग सहाव्यांदा उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवित आहेत.
उत्तर गोवा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपाच्या येथील मुख्यालयाजवळ झालेल्या जाहीर सभेत श्री. नाईक बोलत होते.

यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, उप-सभापती ज्योशुआ डिसौझा, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मच्छिमारी मंत्री निळकंठ हळर्णकर, ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, साळगांवचे आमदार केदार नाईक, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिओलीच्या आमदार डिलायला लोबो, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, मयेंचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पर्येंच्या आमदार देविया राणे, सांताक्रुझचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस, भाजपाचे सरचिटणीस दामू नाईक, ज्येष्ठ भाजपा नेते गोविंद पर्वतकर, उत्तर गोवा भाजपा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, विविध ठिकाणे जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक, सरपंच, पंच, भाजपाचे असंख्य कार्यकर्ते आणि श्रीपाद नाईक यांचे गोव्यातील व गोव्याबाहेरील चाहते उपस्थित होते.
सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढविणारे श्रीपाद नाईक यांनी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सिद्धार्थ कुंकळ्ळीकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर यांच्यासह श्रीमहालक्ष्मी व वरद विनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले व तेथून भाजपाच्या मुख्यालयाकडे निघाले, जिथे त्यांचे मोठ्या जल्लोषात आणि घोषणांनी स्वागत झाले. यावेळी सदानंद शेट तानावडे, रोहन खंवटे, विश्वजित राणे, गोविंद गावडे डिलायला लोबो यांची उत्स्फूर्तपणे भाषणे झाली. श्रीपाद नाईक यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडणून आणण्याचा सूर सगळ्या वक्त्यांच्या भाषणातून उमटला. सभेनंतर भाजपा मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सारा परिसर घोषणांनी दणाणून गेला.
श्रीपादभाऊ डबल हॅट्रिक साधतील – रोहन खंवटे
श्रीपादभाऊ सहावी लोकसभा निवडणूक जिंकून निश्चितपणे हॅट्रिक साधणार आहेत, असे सांगून पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रात नरेंद्र मोदीजी विकसित भारतचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. २०४७ साली भारत कसा असावा, यासाठी युवा, नारीशक्ती, शेतकरी व गरीब या चार स्थंभावर ते काम करीत आहेत, त्यांच्या विकासाठी झटत झाहेत, भारताला आत्मनिर्भर, विश्वगुरू बनविण्यासाठी सगळ्यांनी मोदीजींचे हात बळकट करू या, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा – गोविंद गावडे
निवडणूक आयुक्तातर्फे मतदानास पात्र ठरलेल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सर्वतोपरी तयारी केलेली आहे. लोकशाह सदृढ करण्यासाठी अधिकाधिक मतदान होणे आवश्यक आहे, असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
यशाची व्याप्ती वाढविण्यासाठी काम करुया – विश्वजित राणे
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे यश निश्चित आहे, पण य़शाची व्याप्ती आम्हाला वाढवायची आहे. त्यासाठी घराघरातून, बूथ पातळीवर मनापासून काम करावे लागेल. तसा संकल्प आपण करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. सत्तरी तालुक्यातून आपण ३० ते ३५ हजारांची आघाडी देऊ, अशी ग्वावीही श्री. राणे यांनी दिली.
विकसित भारतासाठी ही निवडणूक आहे – तानावडे
सर्वार्थाने ही वेगळी निवडणूक आहे. विकसित भारत निर्माणासाठीची ही निवडणूक आहे. प्रधानमंत्री मोदीजींचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे. आतापर्यंत न झालेले मतदान यंदा होईल, याची मला खात्री आहे, असे राज्य सभा खासदार तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
शिओलीच्या आमदार श्रीमती डिलायला लोबो यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.