गोवा खबर:सर्व राज्य, निमसरकारी खाते, स्वायत्त संस्था, महामंडळांसाठी आरटीआय ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यामुळे नागरिकांना ऑनलाइन आरटीआय अर्ज, प्रथम अपील आणि आरटीआय शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
सार्वजनिक माहिती अधिकारी, सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी आणि सरकारी खात्यांचे नोडल अधिकारी या सार्वजनिक अधिकारिणींना सुविधा देण्यासाठी आरटीआय कायद्यांतर्गत नोडल एजन्सी असलेल्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने त्यांना प्रबोधन करण्यासाठी आणि पुरेसे ज्ञान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अधिकाऱ्यांना राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या आरटीआय पोर्टलच्या कामकाजाची आणि कार्यपद्धतीची माहिती करून घेता येईल. आरटीआय कायद्यांतर्गत अनिवार्य केल्याप्रमाणे संबंधित पीआयओद्वारे आरटीआय विनंतीची सुरळीत, प्रभावी आणि वेळेवर हाताळणी सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

ऑनलाइन आरटीआय अर्ज भरण्यासाठी नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरटीआय पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
आल्त पर्वरी येथील कौटिल्य लेख भवनातील लेखा संचालनालयाच्या परिषदगृहात पीआयओ, एपीआयओ आणि नोडल अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आज सुरू झाला. हे प्रशिक्षण २८ मार्चपर्यंत घेण्यात येणार असून सहा तुकड्यांमध्ये आरटीआय कायद्यांतर्गत सर्व सार्वजनिक अधिकारिणींना प्रशिक्षणात समाविष्ट करून घेण्यात येईल. ऑनलाइन आरटीआय पोर्टल एनआयसीने डिझाइन आणि विकसित केले आहे.
एनआयसीचे तांत्रिक संचालक श्री. सतेश रेडकर यांनी ऑनलाइन आरटीआय पोर्टलबद्दल माहिती दिली आणि प्रशिक्षण कार्यक्रमातील सुमारे २०० सहभागींना नियम आणि कायदे, प्रक्रिया, वैशिष्ट्ये इत्यादींशी संबंधित विविध पैलूंबद्दल माहिती दिली.
सुरवातीस माहिती व प्रसिध्दी खात्याचे जनमाहिती अधिकारी श्री प्रकाश नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.