गोवा खबर:गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने, डिजेबिलीटी अलायन्स इल्क्लुजीव गोवा यांच्या सहकार्याने आज कदंब बसस्थानक, मडगाव येथे आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर दिवस तथा मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्य निवडणूक अधिकारी, श्री रमेश वर्मा आयएएस यांनी मतदानाचे महत्त्व आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना बूथचे व्यवस्थापन करून निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिव्यांग व्यक्तीने चालविलेल्या सर्वोत्कृष्ट बूथसाठी पुरस्कार जाहीर केला. मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या सर्व इच्छुक दिव्यांग कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय मतदार दिनी सन्मान करण्यात येईल असेही ते म्हणाले.

श्री ताहा हझिक, अपंग व्यक्तींसाठी राज्य आयकॉन यांनी सुलभ निवडणुकांबद्दल उपस्थितांना संबोधित केले, तर संसाधन व्यक्ती श्री निरंजन जाधव यांनी व्हीलचेअर वापरण्याशी संबंधित स्वातंत्र्याबद्दल माहिती दिली. व्हीलचेअर हे उपजीविकेचे साधन म्हणून कसे काम करू शकते आणि लोकोमोटर दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांवर मतदान करण्यास सक्षम कसे बनवू शकते यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
मानसोपचार सामाजिक कार्याचे सहाय्यक प्राध्यापक आणि प्रवेशयोग्य निवडणुकांचे नोडल अधिकारी श्री सुदेश गावडे यांनी आपल्या स्वागत भाषणात गोव्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर दिनाचे आयोजन करण्यात येत आहे असे सांगितले. व्हीलचेअरचा वापर गरजूंसाठी सहाय्यक साधन म्हणून करून नैतिक मतदानाविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे ते म्हणाले.
बूथचे व्यवस्थापन करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री विशांत नागवेकर आणि डॉ. विठ्ठल राणे यांनी दिव्यांग व्यक्तींनी चालविलेल्या मतदान केंद्रांवर पीठासीन अधिकारी म्हणून काम करतानाचे अनुभव सांगितले.
यावेळी ईव्हीएमचा वापर स्पष्ट करणारे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
नोडल अधिकारी एसव्हीइइपी दक्षिण गोवा श्रीमती दीपाली नाईक आणि , डिसॅबिलिटी अलायन्स फॉर इनक्लुसिव्ह गोवाचे अध्यक्ष श्री पॅट्रिक डिसोझा यावेळी उपस्थित होते.
संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. त्रिवेणी वेळीप यांनी आभार मानले तर श्रीमती शिवांगी आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.