गोवा खबर: वीजमंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानाजवळील ३३ केव्ही वेर्णा १ आणि २ वीज वाहिनीच्या स्थलांतराच्या पायाभरणीनंतर माध्यमाशी बोलताना पावसाळ्यापूर्वी सर्व संबंधित कामे अद्ययावत करून पूर्ण करून राज्यात अखंडित वीजपुरवठा देण्याचा सरकारचा मानस आहे असे सांगितले.
पुढे बोलताना श्री ढवळीकर यांनी ४० वर्षे जुनी ३३ केव्ही हाय टेंशन वीज वाहिनी मैदानाच्या जमिनीवरून जात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांनी ग्रामसभेत आपली समस्या मांडून ठरावही मंजूर केला आहे. सरकारने लोकांच्या सुरक्षेची दखल घेत ही वीजवाहिनी हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

वीज खात्याच्या सहाय्यक अभियंत्या श्रीमती. शिल्पा बखले यांनी यावेळी बोलताना या कामाचा अंदाजे खर्च ३ कोटी रूपये असल्याचे सांगितले. पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या स्थलांतराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी मोनो पोलसारखी उपकरणे वीजवाहिनी वाहून नेण्यासाठी उभारण्यात येणार आहेत.
जि.प.सदस्य श्री.गणपत नाईक, बांदोडाचे सरपंच श्री. सुखानंद कुर्पासकर, कवळेच्या सरपंच श्रीमती. मनुजा नाईक, बांदोडाच्या उपसरपंच श्रीमती. चित्रा फडते, कवळेचे उपसरपंच श्री.सुशांत कपिलेश्वर, विद्युत खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. सुदिन कुंकळीकर व इतर यावेळी उपस्थित होते.