गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या ७ ते ८ वर्षात ठोस परिणामांची अपेक्षा करीत विज्ञानधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून गोव्यात वैज्ञानिक मानसिकता रुजविण्याचा विश्वास व्यक्त केला. उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणाऱ्या विज्ञान धारा २०२४ च्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गणित आणि विज्ञान विषयांबद्दल विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी डॉ. सावंत यांनी हाऊसिंग बोर्ड सांखळी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित लॅब सुरू करण्यात आला आहे असे सांगितले. प्राथमिक स्तरावर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये रस निर्माण करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित लॅबचा विस्तार करण्याची राज्य सरकारची योजना आहे असे त्यांनी सांगितले..

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विज्ञान धारा २०२४ हा वैज्ञानिक शोध आणि शिक्षणाचा अतुलनीय प्रवास दर्शवितो असे सांगितले. हे एक व्यासपीठ म्हणून काम करते जिथे कल्पनाशक्ती ज्ञान आणि नावीन्यपूर्णतेसह एकत्रित होते, वैज्ञानिक कुतूहलाच्या बीजांसाठी सुपीक आधार प्रदान करते असे ते म्हणाले. येत्या ४५ दिवसांत, १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नियोजित केलेल्या ५०० हून अधिक उल्लेखनीय कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे हा उपक्रम गोव्यातील ७५,००० हून अधिक तरुणांमध्ये वैज्ञानिक भावना जागृत करण्यासाठी सज्ज आहे असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांखळी येथील सरकारी महाविद्यालय येथे पहिले कौशल्य ग्रंथालय सुरू करण्यावर भर दिला, पुस्तक रसिकांना नोंदणी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या या संसाधनाचा वापर करण्यासाठी आमंत्रित केले आहे असे ते म्ङणाले. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, मुख्यमंत्री सावंत यांनी लोकांना हे व्हिजन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले.

याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या फिट इंडिया, स्किल इंडिया आणि सर्वसमावेशक भारत या मोहिमांची माहिती दिली. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार स्तंभांची रूपरेषा सांगितली.
सर्व तरुणांनी My Bharat gov.in अॅप डाऊनलोड करावे आणि नोंदणी करावी तसेच त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यांचे प्रोफाइल अपडेट ठेवावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री भूषण सावईकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विज्ञान धारा (२०२३) च्या अलीकडील आवृत्तीची माहिती दिली जी खूप यशस्वी झाली. त्यात सार्वजनिक व्याख्याने, भाषणे आणि प्रात्यक्षिके, २५४ शाळा, उच्च माध्यमिक अस्थापने, महाविद्यालये, गोवा विद्यापीठ आणि विविध सार्वजनिक ठिकाणे अशा विविध सत्रांचा समावेश होता.
सेंटर फॉर रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन या विशेष मासिकाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले
शिक्षण सचिव श्री. प्रसाद लोलयेकर, आयएएस हेही यावेळी उपस्थित होते.
सुरवातीस नेशजू एन्व्हायरोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि संस्थापक श्री गणेश चारी यांनी चांगल्या सार्वजनिक आरोग्य आणि हवामान कृतीसाठी पर्यावरण निरीक्षण या विषयावरील सत्राचे नेतृत्व केले.
कार्यक्रमाला गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळातील संशोधन विकास आणि नवोपक्रम विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश माजिक आणि आरडीआय-जीएसएचईसीचे प्राध्यापक प्रा. तिळवी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.