Connect with us

गोवा खबर

रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सरकारच्या कार्यक्रमाचा दिगंबर कामत  व दामू नाईक यांना गैरवापर करु दिल्याबद्दस माफी मागावी – कॅप्टन विरियातो फर्नांडिस

Published

on

Spread the love
योगिराज- दामूचा सहभाग थांबवा किंवा विरोध प्रदर्शनाला सामोरे जा
गोवा खबर: बालचित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्डाचे पराभूत भाजप उमेदवार दामोदर नाईक यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सवंग  प्रसिद्धीसाठी योगीराज कामत आणि दामू नाईक यांना प्रसारमाध्यमांना संबोधित करू दिल्याबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे.
स्वयंघोषित गॉडमॅन आणि पक्षबदलू आमदार दिगंबर कामत यांनी आपला मुलगा योगीराज कामत यांना करदात्यांच्या पैशांच्या कार्यक्रमाचे सरकारी व्यासपीठ वापरून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केल्याचा आम्ही जाहिर निषेध करतो असे  कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
भाजपचे सरचिटणीस दामू नाईक हे सरकारी खर्चाने आयोजित बालचित्रपट महोत्सवात कसे सहभागी होऊ शकतात? असा प्रश्न विचारत, विरियातो फर्नांडिस यांनी गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच उपाध्यक्ष डिलायला लोबो दिगंबरव दामूचा सत्तेचा दुरुपयोग थांबवतील का? असा सवाल विचारला आहे.
रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रपट महोत्सवासंदर्भात फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक आणि दिगंबर कामत यांचे पुत्र योगीराज कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी योगीराज आणि दामू नाईक यांना कोणत्या अधिकाराने प्रसारमाध्यमांना संबोधीत करण्याची परवानगी दिली हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी केली आहे.
योगीराज व दामूना स्थान देणे म्हणजे चित्रपटांशी निगडीत असलेल्या अस्सल कलाकारांचा अपमान आहे. आपल्याकडे अनेक गोमंतकीय कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले आहे. परंतू पक्षांतर बहाद्दर दिगंबर कामतांच्या पुत्राला व फातोर्डाच्या पराभूत उमेदवाराला सामावून घेण्यासाठीच सच्चा कलाकारांना बाजूला करण्यात आले आहे असा आरोप कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
दामू नाईक आणि योगीराज कामत यांना शासनाच्या निधीतून होणाऱ्या बालचित्रपट महोत्सवातून बाहेर ठेवावे, अशी आमची मागणी आहे. महोत्सवादरम्यान त्यांना व्यासपिठावर स्थान दिल्यास आम्ही तीव्र निषेध करू. आमच्या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेला सरकार जबाबदार असेल, असा इशारा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिला आहे.