Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठी प्रतिनिधींना नोंदणी मोफत

Published

on

Spread the love
गोवा खबर:बहुप्रतिक्षित तसेच दिव्यांगजनांसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा – २०२४,  8 ते 13 जानेवारी 2024 पर्यंत होणार आहे. या फेस्टसाठी ‘वैयक्तिक’ तसेच ‘संस्था’ या श्रेणीत प्रतिनिधींना मोफत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी दिली आहे.
गोवा राज्य दिव्यांगजन आयोग, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक असून यासाठी http://www.purplefest.goa.gov.in/ या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा-२०२४ च्या आयोजनामागचा उद्देश एक सर्वसमावेशक व विविधतेचा स्वीकार करणारा समाज निर्माण करण्यासाठी संवादाला चालना देणे आहे. या पर्पल चळवळीचा भाग होण्यासाठी या महोत्सवात नोंदणी करण्याचे आवाहन पावसकर यांनी केले आहे.
पावसकर म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवाच्या आयोजन समितीने आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रवेशसुलभता आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर केंद्रीत थिंक टँक सत्रे आयोजित केली आहे. या क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत जागरूकता वाढवणे तसेच यासाठी सक्षम उपाययोजना उपस्थित करणे हा यामागचा उद्देश आहे. याशिवाय, सहभागींसाठी क्रूझ राइड्स, बर्ड ट्रेल्स, मुव्ही स्क्रिनिंग, ड्रम सर्कल आणि स्टारगेझिंग सेशन अशी मनोरंजनात्मक उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे”.
दिव्यांगाचे आयुष्य कसे असते याचे प्रात्यक्षिक पर्पल एक्स्पिरियन्स झोनमध्ये दाखविण्यात येईल. यावेळी
धोरणकर्ते, शासकीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आणि सामान्य प्रेक्षकांची उपस्थिती असेल. याशिवाय दिव्यांगांसाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त पावसकर यांनी दिली.
पर्पल फेस्टमधील विविध उपक्रम:
1) पर्पल कन्व्हेन्शन्स
2) पर्पल थिंक टँक
3) पर्पल एक्स्पिरियन्स झोन
4) पर्पल एक्झिबिशन
5) पर्पल फन
6) पर्पल रेन
7) पर्पल केलिडोस्कोप
8) पर्पल स्पोर्ट्स
9) पर्पल स्पेक्ट्रम