Connect with us

गोवा खबर

मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गोव्याला सुवर्ण, रौप्य व कांस्य

Published

on

Spread the love
गोवा खबर: ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याच्या दिवशीच गोव्याने घवघवीत यश संपादन केले. फोंडा येथे गोव्याच्या मॉडर्न पेंटाथलॉन पथकाने गुरुवारी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली.
सांगे नेत्रावळी गावातील २२ वर्षीय आदिवासी मुलगा बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात १२.२६.२७ सेकंद अशी वेळ नोंदवत गोव्याला सुवर्ण जिंकून दिले. काही स्पर्धांमध्ये पदकाच्या जवळ येऊन हुलकावणी मिळाल्यानंतर गोव्याचे यंदाच्या स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले. ट्रॅक्टर मॅकेनिकचा मुलगा असलेल्या बाबू याने यानंतर सीता गोसावी हिच्यासह मिश्र रिलेमध्ये रौप्य पदक मिळवून दिले. गोव्याच्या महिला संघाने रेझर रनमध्ये कांस्य पदक मिळविले.
गावक-गोसावी यांच्या मिश्र रिले संघाने १६.०१.५० अशी वेळ नोंदवली. हरियाणाच्या अंजू-रवी जोडीने १५.२३.९१ अशा वेळेसह  सुवर्ण मिळवले. महिलांच्या रेझर रनमध्ये मध्य प्रदेशने सुवर्ण तर महाराष्ट्रने रौप्य पदक जिंकले.
गोव्याच्या पुरुष नेटबॉल संघाने फास्ट फाईव्ह प्रकारात आपल्या सलग दुसर्‍या विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ‘अ’ गटातील पहिल्या सामन्यात त्यांनी उत्तर प्रदेशचा ३३-२० असा पराभव केला. यानंतर राजस्थानला त्यांनी ४०-२८ असे पराजित केले. महिला संघाला मात्र हिमाचल प्रदेश व केरळकडून पराभवामुळे बाहेर जावे लागले. हिमाचलने गोव्याचा २४-१५ असा तर केरळने २६-२४ असा पराभव केला.