गोवा खबर: पहिला जनता दरबार आज माथानी साल्ढाना मडगांव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्री श्री आतानासिओ मोन्सेरात यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना महसूल मंत्री श्री मोन्सेरात यांनी दर महिन्याला एक आमदार जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेणार आहे असे सांगितले. “जनता दरबार हा आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित खाते आणि अधिकाऱ्यांसमोर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेला एक अनोखा उपक्रम आहे. जनतेच्या तक्रारींना मामलेदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी मानवी स्पर्श देणे ही काळाची गरज आहे. जनतेला त्रासमुक्त सेवा पुरवल्या पाहिजेत आणि त्यांना या सेवेसाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडू नये असे ते पुढे म्हणाले.

अधिकाऱ्यांनी लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि कोणताही अधिकारी नसल्यामुळे उशीर करू नये असे त्यांनी सांगितले. पहिल्या जनता दरबारात लोक मोठ्या संख्येने त्यांच्या समस्या घेऊन आल्या आणि महसूलमंत्र्यांनी त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

जनता दरबारात उपस्थित इतर मान्यवरांमध्ये मडगावचे आमदार श्री. दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार, श्री आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वेळीचे आमदार, श्री क्रुझ सिल्वा, बाणावलीचे आमदार, श्री वेंझी व्हिएगस, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी श्री अश्विन चंद्रू, आयएएस आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.