गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी प्रशिक्षणार्थी व कौशल्य विकास या विषयावर थेट आभासी संवाद साधताना १५ जुलै पर्यंत आयटीआय, हस्तकला पॉलिटेक्निक यांसारख्या विविध क्षेत्रांतर्गत तरुण व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, पुनर्कुशलीकरण आणि अपस्किलिंगवर भर देऊन नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम पोर्टलवर नोंदणी केलेल्या ५ हजार तरुणांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य या तत्त्वावर थेट सरकारी खात्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून सामील करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

आतापर्यंत केवळ १२०० युवकांनी नोंदणी केली आहे अशी माहिती देत मुख्यमंत्र्यांनी युवकांनी डेटा एन्ट्री, अकाउंटंट, ड्रायव्हर, क्लिनर इत्यादी उपलब्ध संधींचा वापर करण्याचे आवाहन केले. गेल्या ८ दिवसांपासून सरकारने सरकारी खात्यांमध्ये सुमारे १०९६ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. खाजगी कंपन्यांच्या संदर्भात, ५० टक्के तरुणांना प्रशिक्षणाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याच कंपनीत कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी मिळू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

गोवा राज्यात १५ वर्षांचे वास्तव्य असलेल्या शिकाऊ उमेदवाराला रु.१५००० विध्यावेतन दिले जाईल.
नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम पोर्टलवर तरुणांची शिकाऊ म्हणून नोंदणी करणे हे प्रत्येक पंच सदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे त्यांच्या संबंधित पंचायत आणि नगरपालिकांचे प्रयत्न असले पाहिजे असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवाराला मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक कालावधीत लवकरच “शिखा आणि कमवा” चा शुभारंभ केला जाईल असेही ते म्हणाले.