गोवा खबर:आम आदमी पार्टीने मंगळवारी येथील आझाद मैदानावर ‘पत्रावळीचेर चर्चा’ कार्यक्रम आयोजित करून भारतीय जनता पक्षाच्या “टिफिन पर चर्चा” मोहिमेचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
या कार्यक्रमात राज्यभरातील विविध भागांतील महिलांनी आपच्या प्रतिमा कुतिन्हो, सेसिल रॉड्रिग्स आणि पॅट्रिशिया फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली भाग घेतला. यात त्यांनी मूलभूत घरगुती वस्तूंच्या वाढत्या किमती आणि यामुळे त्यांच्या वाढत चाललेल्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.
आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि आप नेते सुनील सिग्नापूरकर, सलमान खान यांनी महिलांना “पत्रावळी” वर जेवण वाढले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे, विविध योजनांची वेळेवर देयके देणे, महागाई नियंत्रणात ठेवणे या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजप सरकार कसे सपशेल अपयशी ठरले आहेत, याबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजपची “टिफिन पर चर्चा” मोहिम सध्याच्या परिस्थितीत घर चालवणे अशक्य वाटणाऱ्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
बेरोजगारी आणि महागाईने सामान्य जनता त्रस्त असताना पंचतारांकित हॉटेल्समध्ये तथाकथित “चिंतन शिबिर” आयोजित करणारे भाजप सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनल्याची टीका अमित पालेकर यांनी केली.
वाल्मिकी नाईक म्हणाले की, 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन आपने ‘गॅरंटी पत्रक’ तयार केले होते. बेरोजगारांना रोजगार प्रदान, रोजगार निर्मिती, महिलांचे सक्षमीकरण आणि घरगुती खर्च कमी करण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. ‘बीपीएल’ कुटुंबांना मोफत तांदूळ देण्याचे निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्यासाठी नुकत्याच निवडून आलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला तांदूळ पुरवठा करण्यासाठी पंजाबच्या आप सरकारने दिलेल्या उदार ऑफरबद्दल माहिती देताना नाईक म्हणाले की, ‘आप’ हा एकमेव पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची काळजी करतो.
एकेकाळी एलपीजीच्या किमतींबाबत दर दुसऱ्या दिवशी आंदोलन करणाऱ्या भाजप महिला मोर्चा आता गप्प का?, असा सवाल अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी उपस्थित केला. भाजपने मते मिळवण्यासाठी मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते परंतु निवडणुकीनंतर ते आश्वासन केवळ जनतेला भुलवण्यासाठीच असल्याचे सिद्ध झाले. समाजकल्याण खात्याचे योजनांचे लाभार्थी अनेक महिने त्यांच्या पैशाची वाट पाहत असताना भाजप सरकार मात्र अनावश्यक कार्यक्रमांना पैसे उधळण्यात दंग असल्याची टीका कुतिन्हो यांनी केली.
या कार्यक्रमात अनेक महिलांनी निराशाही व्यक्त केली. वाढती बेरोजगारी आणि वाढत्या किमती एवढ्या त्रासदायक ठरत आहेत की त्यांच्या मुलांचे पोषण आणि शिक्षण यासारखी मूलभूत गरजाही पूर्ण करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.