गोवा खबर: ‘जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाचे जतन व्हावे, तसेच भावी पिढीला धर्माभिमानी लोकांच्या बलिदाचा इतिहास कळावा, या उद्देशाने गोवा शासनाने ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
जुलमी पोर्तुगिजांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वीत अत्याचाराची साक्ष देणारा ‘हात कातरो’खांब जुने गोव येथे उभा आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी १८ जून या दिवशी ‘हात कातरो’ खांबाला पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी श्री. सत्यविजय नाईक बोलत होते. या वेळी ‘केरलीय क्षेत्र परिपालन समिती’ बदलापूर (महाराष्ट्र) आश्रमाचे स्वामीजी पी.पी.एम्. नायर्, ‘शिव छत्रपती संघटने’चे श्री. सज्जन जुवेकर, श्री. आनंद मांद्रेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, श्री गोपाळकृष्ण मंदिराचे अध्यक्ष श्री. सत्यवान म्हामल, सचिव श्री. अशोक नाईक, दिवाडी येथील विद्याभारती संचालित सेंट एलॉयसियस् विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. यानंतर श्री. सत्यविजय नाईक पुढे म्हणाले,‘‘हात कातरो’ खांबाची माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली पाहिजे, तसेच खांबाच्या ठिकाणी खांबाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती असलेला फलक लावला पाहिजे’’. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी यांनी केले.