गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा क्रांती दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त दिल्या आहेत. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या दिवसाला खास महत्त्व आहे.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणतात, “गोवा क्रांती दिनाचे गोमंतकीयांसाठी विशेष महत्त्व आहे. याच दिवशी, १९४६ रोजी, पोर्तुगीजांच्या परकीय राजवटीतून त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध गोमंतकीयांनी खुले पण शांततेने बंड केले. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियो मिनेझिस यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढण्यासाठी निर्भय भाषण करून पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढण्यासाठी गोमंतकीयांचे धैर्य वाढविले.

मडगाव येथे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पेटविलेली ठिणगी स्वातंत्र्य चळवळीच्या अंतिम टप्प्यात गोवा मुक्तीपर्यंत पोहोचली. ४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीनंतर हुकूमशाही राजवटीचा विरोध करण्यासाठी हजारो गोमंतकीय एकत्र आले आणि शेवटी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिज राजवटीतून मुक्त झाला.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री पुढे म्हणतात, “गोवा क्रांती दिन हा स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा होता ज्यात हजारो गोमंतकीयांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. हा काळ स्वातंत्र्यसैनिकांच्या परमोच्च बलिदानाचा साक्षीदार होता. अनेकांनी हौतात्म्य पत्करले आणि अनेक लोकांना तुरूंगवास, संकटाना तोंड द्यावे लागले.
“गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आदरणीय हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे आपण स्मरण करूया आणि त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्याचा हा प्रसंग आहे. चला आपण एकत्र येऊन हातात हात घालून कष्टाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी स्वतःला झोकून देऊया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.